पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे : अजित पवार   

पुणे : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघामध्ये पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे. त्यामुळे आपण निवडणुकीसाठी मदत करावी, असे आवाहन जिल्ह्यातील वस्ताद आणि पैलवानांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी केले.मी केवळ बारामती मतदार संघासाठी याठिकाणी आलो नाही. मी कोणत्याही  स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेले नाही. शिरूर मावळ, पुणे आणि बारामती अशा चारही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे, असा दंड उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील पैलवानांच्या मेळाव्यात थोपटला आहे. 
 
मला बारामती लोकसभेतील पैलवानांची मदत घ्यायची आहे, असे मी पदाधिकार्‍यांना सांगितले. त्यासाठी आपण वस्ताद आणि पैलवानांचा मेळावा आयोजित केला आहे. पैलवानांचा मोठा वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे. महाराष्ट्र केसरीच्या पातळीवर आपण हे अनुभवतो. कुस्तीच्या महासंघातील वादाचे पडसाद गल्ली ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळाले. हे वाद आपल्याला मिटवायचे आहेत. त्यासाठीच आज आपण हितगुज साधत आहोत.
 
पवार म्हणाले की, आम्ही साधुसंत नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. तुमच्या सहकार्याने आम्ही सरकार चालवतो. पैलवानांना ही प्रतिनिधित्व करता यावे, यासाठी आपण पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिलेली आहे. तुमच्यातील एक सहकारी मुरलीधर मोहोळांच्या रूपाने लोकसभेत जाणार आहे. एकंदरीत कल पाहता मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात कोणतीही अडचण वाटत नाही.
 
यंदा प्रत्येकाने मतदान करा, तुमचे अमुल्य मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या, अशी विनंती अजित पवारांनी उपस्थितांना केली. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि येत्या काळात प्रत्येक खेळाडूला आम्ही हवी ती मदत करु, असं आश्वासनही अजित पवारांनी खेळाडूंना दिले आहे. 
 

Related Articles