कसबा शिवसेनेला सोडा; ठाकरे गटाची मागणी   

पुणे : पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काम करेल. मात्र कसबा विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
 
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी शहर काँग्रेस जिल्हा कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, संजय बालगुडे, अजित दरेकर, अमीर शेख, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, कल्पना थोरवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, आदी उपस्थित होते.
 
आम्ही कसबा विधानसभेला जीवाचे रान करुन प्रचार केला. आताही लोकसभेचा प्रचार करु आणि धंगेकरांना विजय मिळवून देऊ. मात्र विधानसभेच्या निवडणुकीला कसबा मतदार संघ उबाठाला द्या, अशी थेट मागणी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मात्र याबाबत सध्या चर्चा नको म्हणून या विषयावर अधिक बोलणे टाळण्यात आले. त्यानंतर बैठकीतील पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. उबाठाने आतापासूनच कसबा मतदार संघाच्या जागेवर दावा केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.
 
या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभानिहाय निवडणूक कचेरी टाकणे, शहर व विधानसभानिहाय समन्वय समिती तयार करणे, २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा, महाविकास आघाडीचे विधानसभानिहाय निरिक्षक नेमणे, तसेच निवडणुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. 
 
दरम्यान भाजपकडून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पुण्याची निवडणूक एकतर्फी होईल, असे बोलले जात होते. मात्र जनसामान्यांचा नेता आणि समाजमाध्यमांवर क्रेझ असलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने ही निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात आहे. यासोबतच मनसेला रामराम ठोकणारे आणि समाज माध्यमात प्रसिद्ध असणारे वसंत मोरे यांनी देखील पुणे लोकसभा निवडणूक थेट होतीच कशी म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यांना आता अपक्ष उमेदवार म्हणूनच अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यामुळे अपक्षाचा अधिक प्रभाव पुणेकारांवर  कितपत पडतो, हे देखील पाहावे लागणार आहे.
 

Related Articles