हवेतील आर्द्रतेमुळे तपमानात वाढ   

पुणे : द्रोणीय स्थितीमुळे हवेत आर्द्रता टिकून आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश भागातील हवामान कोरडे असणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत कमाल तपमानात १ ते २ अंशाने वाढ होणार आहे. ऊन्हासह उकाड्यातही वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने बुधवारी वर्तविला. 
 
द्रोणीय रेषा दक्षिण कर्नाटक ते विदर्भावर आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर असलेल्या प्रतिचक्रवातामुळे राज्यात आर्द्रता वाढत आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तपमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट असणार आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात उद्या (शुक्रवारी) मेघगर्जना व सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.राज्याच्या उर्वरित भागात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात काल अकोला येथे उंच्चाकी ४१.५ अंश, तर पुणे येथे नीचांकी २०.५ अंश किमान तपमानाची नोंद झाली. 
 

पुण्यात आज विक्रमी तपमान?

 
पुणे आणि परिसरात मागील काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे. त्याचाच परिणाम म्हणून तपमानात वाढ होत आहे. आज (गुरूवारी) शहरात ४० अंश कमाल तपमानाची नोंद होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उद्या (शुक्रवार) पासून पुन्हा एक अंशाने घट होणार आहे. शहरात दोन ते तीन दिवस आकाश नीरभ्र असणार आहे. कमाल तपमानात किचिंत घट होणार असल्याचा अंदाज आहे. काल शहरात ३९ अंश कमाल, तर २०.५ अंश किमान तपमानाची नोंद झाली. 
 

Related Articles