पुणे-दुबई-सिंगापूर विमानसेवा सुसाट   

पुणे : पुणे विमानतळावरून होत असलेल्या दुबई (शारजा) आणि सिंगापूर या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १ लाख ६९ हजार ३२९ प्रवाशांनी पुण्यातून थेट दुबई, सिंगापूरला प्रवास केला आहे. तसेच, या प्रवाशांकरिता पुणे विमानतळावरून तब्बल १ हजार ५५४ विमानोड्डाणे झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
 
लोहगाव येथील विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येथील जुन्या टर्मिनलवर प्रवाशांचा भार वाढला आहे. येथून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मिळून अशी दिवसाला १८० ते १९० च्या घरात विमानोड्डाणे होत असतात. त्याद्वारे दिवसाला २५ ते ३० हजार प्रवाशांचा प्रवास होतो. मात्र, ही वाढती संख्या पाहता आता पुणे विमानतळ प्रवाशांसाठी अपुरे पडत आहे. परिणामी ते गैरसोयीचे बनले आहे. परंतु, हे लक्षात घेत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने येथील जुन्या टर्मिनलला लागूनच येथे भव्य असे नवीन विमानतळ टर्मिनल उभारले आहे. विमानतळ आणि स्थानिक प्रशासन येथील धावपट्टी वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहेत.
 
अलीकडील काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर पुण्यातून थेट परदेशात प्रवासास पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. सुट्यांच्या कालावधीमध्ये म्हणजेच उन्हाळी सुट्यांच्या मे महिन्यात सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे.
 

Related Articles