फिफा विश्वचषकामध्ये भारताच्या खेळण्याच्या आशा मावळल्या   

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. फिफा क्रमवारीत १५८व्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने ११७ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघावर २-१ असा विजय मिळवला. या पराभवामुळे भारताच्या फिफा विश्वकरंडक आशियाई पात्रता पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला आहे.भारतीय संघाचा महान खेळाडू सुनील छेत्री याने अफगाणिस्तान विरुद्ध आपल्या कारकिर्दीचा १५०वा सामना खेळला. या लढतीत त्याने संस्मणीय गोलही केला. ३८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करीत त्याने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने पूर्वार्धात ही आघाडी कायम ठेवली.
 
भारतीय संघाने उत्तरार्धातही आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र ७० व्या मिनिटाला रहमत अकबारी याने अफगाणसाठी अफलातून गोल करीत त्यांना बरोबरी साधून दिली. तसेच सामना संपायला काही मिनिटे बाकी असतानाच शरीफ मुखम्मद याने अफगाणिस्तानसाठी दुसरा गोल करीत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
 
अ गटामध्ये कतारचा संघ ९ गुणांसह पहिल्या स्थानावर असून भारतीय संघ चार गुणांसह दुसर्‍या, तर अफगाणिस्तानचा संघ चारच गुणांसह तिसर्‍या स्थानावर विराजमान आहे. कुवेत तीन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या उर्वरित दोन लढती सहा जून रोजी कुवेत व ११ जून रोजी कतारशी होणार आहेत.
 

Related Articles