मराठीतील आद्य कवयित्री महदंबा   

या वर्षी महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आठशेव्व्या प्रकट दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. महाराष्ट्रात पूर्वी जे समाज प्रबोधन झाले. त्यात फार मोठा वाटा श्री चक्रधर स्वामी आणि त्यांच्या अनुयायांचा आहे. इतकच नाही तर महाराष्ट्रातील आद्य कवयित्री म्हणून आजही साहित्यिक महानुभावातील महदंबाकडेच आदराने पहातात.
 
स्त्री-लोकगीतांची परंपरा तशी अगदी वेदकाळा पासून प्रचलित असावी, हा लोकवाङ्मयाचा अनुमान आद्य मराठी कविता ’धवळे’ वाचून अधिक समृद्ध होतो. तसेही रामायण, महाभारतातही स्त्री गीतांचे उल्लेख आहेत.
 
संस्कृत कवयित्री विज्जिकाने धान्य दळण कांडताना करताना म्हणत असलेल्या गीतांचे सुंदर वर्णन केले आहे. परंतू यादव काळातील महदंबांच्या ’धवळे’ या सारख्या काव्यमागे दीर्घ स्त्री गीताची परंपरा आहे हे निश्चितच जाणवते. महदंबांनी स्त्री असूनही, स्त्रीमनाचाच सूचक कानोसा आपल्या धवळे काव्यातून घेतला आहे. यादवकाळ हा मराठी साहित्याचा उषःकाल आहे. कारण ह्याच काळात महानुभावपंथ आणि वारकरीपंथ उदयाला आल्याने, त्यावेळी निर्माण झालेल्यां वाङ्मयात एक वेगळेच नाविन्य आढळते आणि साहित्याचे चैतन्य अधिक समृद्ध झालेले जाणवते.
 
खरं तर स्त्री घटक तेव्हा काहीसा दबलेला असतानाही, याच यादव काळात स्त्रीया गाऊ लागल्या, स्त्रीया लिहू लागल्या. कारण याच काळात नाथ-महानुभाव-वारकरी-समर्थ ह्या प्रमुख संप्रदायांनी आध्यात्मिक क्षेत्रात ’स्त्री’ ला स्वातंत्र्य बहाल केले. त्यामुळेच आध्यात्मिक भत्कीच्या रूपाने स्त्री साहित्यातून आपल्या भावना प्रकट करू लागली.
 
म्हणूनच त्याकाळातील संत कवयित्रीं महदंबा, मुक्ताई, जनाई, सोयराबाई, कान्होपात्रा, गोणाई, रजाई, लाडाई, भागू महारीण, निर्मळा, बयाबाई, वेणाबाई, कमळाइसा, नागाइसा, बाईसाहेब, देमती, नाईकबाई अशा कितीतरी स्त्रीसंतांच्या काव्याचा अभ्यास करताना त्यांच्या स्त्री सुलभ भावाविष्काराचा प्रत्यय ठायी ठायी येतो. त्यातील शब्दकळा, शैली, ठराविक बायकी शब्द वाचताना त्यांच्या स्त्री मनाचा अनुभव येतो. जनाबाईंच्या ’लेकुरवाळा’, रूक्मिणीच्या कुंका, बछडे, किंवा सोयराबाईंच्या सडे घालते, नीरांजन ओवाळणे, रांगोळी काढणे ह्यातून स्त्री भाव विश्र्व फुलून येते. वारकरी संतकवयित्री यांनी जसा अभंग निर्मितीत आपला ठसा उमटवला. तसा महानुभाव संतकवयित्री यांनी ओवी, स्फुट, आख्यानकाव्या बरोबर गेयतेत आपला ठसा उमटवला.
 
महानुभाव पंथाने ज्या अफाट साहित्याची निर्मिती केली, त्यात संत कवयित्रींचा सुध्दा मोलाचा सहभाग आहे. आजही महानुभाव पंथातील महादंबा ह्या मराठीतल्या आद्य कवयित्री आणि महानुभाव पंथातील श्रेष्ट विदुषी म्हणूनच गणल्या जातात. त्यांच्या काव्याचा अभ्यास केला तर त्यात कलाभिरुची, सडेतोडपणा, चातुर्य, वैराग्य, स्त्रीसुलभमस्तर, पंथनिष्टा ह्या सगळ्या गुणांचा त्यांच्या प्रतिभेशक्तीत समावेश आहे हे जाणवते.
 
अर्थात ’धवळे’ काव्यावरुन महदंबांची आद्य कवयित्री म्हणून ओळख असली तरी मातृका, गर्भकांड ओव्या, रूक्मिणीस्वयंवर, स्फुट पदे ही उत्स्फूर्त भाषाशैलीतून  नाट्यपूर्ण प्रसंग दाखवणारी आहेत. किंबहुना सांकेतिक आणि बोलीभाषेमूळे त्याला लोकगीताचा घाट प्राप्त झाल्याचेही अभ्यासकांनी म्हंटले आहे.
धवळ्यातील ओवीत महदंबा म्हणतात...
रूक्मिणीसी सखिया सांघती वृत्तांतु
सर्वांगी न देखेचि तुझा ओ कांतु
देखिले तेचि आंग तेथोनिया नयन न ढळती
 
ह्यावर प्रा. कुरूंदकर आपल्या समिक्षणात म्हणतात की ’धवळ्याला वाचताना हे एका स्त्रीचे लिखाण वाचत आहोत, असे जाणवत नाही. स्त्री सुलभ सावधगिरी स्त्रीच व्यक्त करू शकते म्हणून त्यातील गोडवा टिकून आहे.
 
’धवले’ हे महदंबचे मराठीतील हे पहिले आख्यानकाव्य ज्याच्यातून तत्कालीन विवाह पद्धतीवर प्रकाश पडतो तसेच केळवण करणे, निंबलोण करणे, मूळ पाठवणे, जोहार करणे, पवाड करणे, कळस ढाळणे असे खूप वाक्प्रचार ह्यामध्ये आढळतात.
 
विशेष म्हणजे महदंबा धवळ्यात स्वत:ला रुक्मिणीची सखी म्हणवतात आणि कृष्णाच्या रूपाचे वर्णन करून झाल्यावर मात्र त्या रूक्मिणीस सांगतात की... ’तुझा पती आम्हाला वंदनीयच आहे. दुसरा विचार आमच्या मनात येत नाही त्याच्या बद्दल’... ह्या वाक्यातच स्त्रीच्या मनातील लज्जा, सावधपणा, शंका, असूया इत्यादी संमिश्र भावसंकुलन मोठ्या कौशल्याने महदंबांनी प्रकट करून स्त्री मनाचा उत्तम कानोसा घेतला आहे.
 
महदंबांच्या काही स्फुट रचना गेय स्वरुपाच्या आहेतच, तसे धवळे सुध्दा गेयच आहे. ते गाण्यातून प्रकटले आहे. तसही ओवी, अभंग, पदे, चौपद्या, आरती, खेळिये ह्या रचना स्त्री मनाच्या निर्मितीला पूरकच, त्यामुळे ’गेयता’ हा गुण स्त्री गीतापासून आलेला असे वाटते.
 
श्री. चक्रधर स्वामींच्या साहित्याचा प्रचंड प्रभाव महदंबेच्या लिखाणावर जाणवत असला तरी, संन्यास दीक्षा घेतल्यानंतर महदंबांनी, स्त्री-पुरुष समानतेचा, हा महनुभाव पंथाचा दृष्टीकोन ठेवून वाङ्मय निर्मितीतून मोलाची भर टाकली आहे. महदंबांचे काव्य कथनात्मरुप आहे; पण त्यात मुलभूत प्रेरणा ही भक्तीभावाचीच आहे.
 
’कृष्ण म्हणजे मुक्ती’ आणि ’कृष्ण म्हणजे जीवन’ हे तत्त्वज्ञान सांगताना महदंबांनी त्यामागील रूक्मिणीची आध्यात्मिकता अधोरेखित केली आहे.
’कृष्णावर पदे लिहून आपला अभ्यास झाला’ असे म्हणणार्‍या महदंबांच्या, स्फुटांचा ओवींचा अभ्यास करताना त्यांच्यातील संतत्वाची नकळत जाणिव होवून, ह्या आद्य कवयित्रीच्या अफाट प्रतिभेचे दर्शन सुध्दा होते.
म्हातारी धर्म रक्षक
म्हातारी प्रीतिरक्षक
 
असा गौरव साक्षात नागदेवचार्यांनी महदंबांचा केला आहे. अध्यात्मज्ञान या दृष्टीने त्या पंडिता होत्या म्हणूनच त्यांनी रुक्मिणीच्या भावावस्थेला काव्यातून उत्कट शब्दात विलक्षण रूप दिले आणि त्यातून व्यक्तीरेखा जिवंतपणे साक्षात करणे ह्यातच महदंबांच्या भक्तीचे कर्तृत्व सिद्ध होते.
 
माहूर येथे दत्त दर्शनाच्यावेळी महदंबां म्हणतात...
अमोघासिध्दी जयाचिया दारी
तो मानापुरी राज्यकरी
तया नमन दत्तोत्रया
अशा ह्या महदंबांच्या खुपशा कविता तीन किंवा साडेतीन ओवींच्या असून, त्या सुंदर शब्दचित्र रेखाटतात.
महानुभावातील कृष्णभक्ती, वारकरी पंथाची विठ्ठलभक्ती, समर्थ संप्रदायातील रामभक्ती वेगळी असली तरी, त्यात एकाच देवाचे दर्शन घडते आणि गुरुनिष्ठा, कृतज्ञता, ईश्वरभक्ती सर्वांच्याच काव्यात सारखीच दिसते.तरी ’धवळे’ सारखी आद्य कविता लिहिणार्‍या, आद्य कवयित्री म्हणून महदंबांचा संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच अभिमान आणि मनात प्रचंड आदर आहे.
 

Related Articles