आर्थिक विकासदरावर मॉर्गन स्टॅन्लेचा विश्वास   

वृत्तवेध
 
गुंतवणुकीत वाढ झाल्याने भारताचा आर्थिक विकास दर वाढत असल्याचे मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेने म्हटले आहे. हा दर २००३-०७ च्या काळातील विकासदराच्या गतीच्या जवळ जातो. त्या काळात भारताचा आर्थिक विकास दर सरासरी आठ टक्क्यांवर होता.
 
मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अहवालात म्हटले आहे की गेल्या दशकात जीडीपीमधील गुंतवणूक कमी होत आहे; पण भारताने भांडवली खर्च वाढवून याला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन आर्थिक प्रगतीच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत. मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात भांडवली खर्च वाढवण्यास अजून वाव असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे परिस्थिती २००३-०७ सारखीच राहिली. वाढता वापर, सार्वजनिक भांडवली खर्च, खासगी भांडवली खर्च, शहरे, तसेच खेड्यांमध्ये वाढती मागणी, जागतिक निर्यातीतील वाढ आणि कमी जोखीम यामुळे भारतीय जीडीपीला सध्या मोठा आधार मिळत आहे.
 
मॉर्गन स्टॅन्लेच्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते, २००३-०७ दरम्यान गुंतवणूक ते जीडीपी गुणोत्तर २७ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांपर्यंत वाढेल, असेच काहीसे चित्र आजही पहायला मिळते. किंबहुना, गुंतवणुकीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. २०११ ते २०२१ या दशकात गुंतवणुकीचे जीडीपी गुणोत्तर कमी झाले. आता ते पुन्हा जीडीपीच्या ३४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मॉर्गन स्टॅन्लेने आशा व्यक्त केली आहे की २०२७ पर्यंत ते ३६ टक्क्यांपर्यंत वाढेल. २००३-०७ या वर्षात भांडवली खर्चात वाढ झाल्यामुळे रोजगार आणि उत्पन्न वाढले होते. या कालावधीत जीडीपीवाढीचा दर सरासरी ८.६ टक्के असून किरकोळ महागाई सरासरी ४.८ टक्के आहे. 
 
गेल्या काही वर्षांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राला अनेक धक्के बसल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. यामध्ये कोविड १९ चाही समावेश आहे; मात्र आता खासगी भांडवली खर्चात तेजी येण्याची चिन्हे दिसत आहेत. 
 

Related Articles