वाचक लिहितात   

केजरीवालांनी राजीनामा देणे उचित

 
दिल्ली कथित दारू गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतरही ते मुख्यमंत्री पदावर कायम आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता तुरुंगातूनच दिल्लीचा राज्यकारभार हाताळत असताना केजरीवालांनी जलमंत्रालया संबंधात एक आदेशही जारी केला आहे. आरोपी म्हणून अटक झाल्यानंतर संविधानिक पदाचा राजीनामा न देणे हे कितपत योग्य आहे? भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातूनच अरविंद केजरीवाल नेते म्हणून पुढे येऊन सत्ताधारी झाले. विरोधात असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची मागणी त्यांनी सत्ताधारी नेत्यांबाबत केली असणारच. त्यामुळे तिच नैतिक जबाबदारी दाखवून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी द्यायला हवा. सध्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यावर केजरीवालांनी परत पदभार सांभाळण्यास काहीच हरकत नाही.
 

दीपक गुंडये, वरळी

 

जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने?

 
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात व्लादिमिर पुतीन यांनी तिसर्‍या महायुद्धाची धमकी नाटो देशांनाच नव्हे, तर अप्रत्यक्षपणे सर्व जगालाच दिली आहे. रशियासुद्धा अण्वस्त्र सज्ज असून, त्याचा कधीही वापर करू शकतो. तसेच त्याचे परिणाम हे दुसर्‍या महायुद्धापेक्षा अधिक गंभीर व भयानक असतील, असे व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. रशिया युरोपवर हल्ला करणार आहे, हा दावा खोटा आहे असे पुतीन यांनी सांगितले. अमेरिकेसह नाटोने रशियावर नव्याने निर्बंध घातले असून, यामध्ये वित्तीय सेवा, पेमेंट सिस्टीम, ऊर्जा उत्पादन यांचा समावेश आहे. ऊर्जा उत्पादनामुळे भारतालासुद्धा आगामी काळ अडचणींचा जाऊ शकतो. कारण, भारताला कोळसा आयात करण्यास अडचणी येऊ शकतात. या निर्बंधामुळे भारतातील अनेक मोठ्या कंपन्या रशियाशी व्यवहार करण्यास धजावणार नाही. पुतीन यांनी भाषणात अमेरिकेवर टीका केली आहे. रशिया पूर्ण अण्वस्त्र सज्ज आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या एकंदरीत वागण्यावरून असे दिसून येत आहे की, व्लादिमीर पुतीन हे जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत?
 

दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई

 

एटीएमबाबत सुरक्षा महत्त्वाची

 
‘केसरी’त दि.२४ मार्च रोजीच्या अंकात ‘एटीएम सेंटरची सुरक्षाव्यवस्था वार्‍यावरच’ ही बातमी वाचली. त्यासाठीची कारणे वाचून सुरक्षारक्षकाविना दिसणारी अनेक एटीएम केंद्रे डोळ्यांसमोर आली! सुरक्षारक्षक नसेल तर पैसे काढताना येणार्‍या अडचणींची माहिती लगोलग बँक अधिकार्‍यांना कोण देणार? ग्राहकांना तिर्‍हाइतांची मदत घ्यावी लागून होणारी फसवणूक कशी रोखणार? स्पाय कॅमेरे नाहीत ना, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत ना? याची खात्री कोण देणार, मशीनमध्ये रोकड आहे किंवा संपली हे ते काढायला गेल्यावर कळणे कसे टळणार, रात्री अपरात्री होणारे मशीनच चोरून नेण्याचे अपवादात्मक प्रकार कसे टळणार, यावर गांभीर्याने विचार करताना केवळ उत्पन्न आणि एटीएम सुरक्षा खर्च यांचा ताळमेळ घालणे पुरेसे नाही. पूर्णवेळ सुरक्षारक्षक नेमणे परवडणारे नसेलच तर, संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांनी एटीएम केंद्रांना वरचेवर भेट देऊन त्यांचे व्यवस्थापन सातत्यपूर्ण व अबाधित आहे हे पाहिले पाहिजे. रोकड भरणा करणार्‍यांबरोबर जबाबदार अधिकारी पाठवून तो सुरक्षेची खात्री करून, प्रत्येकवेळी त्याचा अहवाल वरिष्ठांकडे देतो का हेही पाहिले जावे.
 

श्रीपाद कुलकर्णी, पुणे

 

ही तर राजकीय धुळवड !

 
देशात १८ व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच सध्याचे राजकीय वातावरण इतके गढूळ झाले आहे, की या राजकीय धुळवडीत एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना असंस्कृत भाषेची परीसीमा गाठली जाणार याचा प्रत्यय यायला लागला आहे. ’तो विंचू आम्हाला आधी डसला’, ’ती तर शकुनी मामाची चाल’, ’चंदा घेऊन धंदा करणे हे त्यांचे काम’, ’चमचे तर सर्वत्रच असतात, ते फक्त आपला कप बदलतात’ ही अगदी अलीकडची राजकीय पटलावरील काही विधाने. निवडणुकीची तारीख जवळ येत जाईल तसतशा राजकीय उखाळ्या पाखाळ्यांना आणखी धार येईल आणि टीकेचा स्तर अधिकाधिक खालावत जाईल. राजकीय जीवनात वावरताना मतभेद होणे स्वाभाविक आणि अपेक्षित आहे. पण, मनभेद होऊन व्यक्तिगत टोकाची जहरी टीका करणे राजकारणात अपेक्षित नाही. पूर्वी ही उतुंग व्यक्तिमत्त्वांची माणसे निवडणुकांच्या सभांमधून विरोधकांना व्यक्तीशः लक्ष्य न करता फक्त जनतेच्या समस्यांवर बोलायची. परंतु सध्या सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेलेल्या दिसत आहेत.
 

प्रदीप मोरे, मुंबई                

 

Related Articles