अर्जेंटिना ७०,००० सरकारी कर्मचाऱ्यांना देणार नारळ   

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइली पुढील काही महिन्यांत ७०,००० सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे. २६ मार्च रोजी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना जेवियर माइली यांनी सार्वजनिक कामे थांबवण्याचा, निधी कमी करण्याचा आणि विविध सामाजिक कल्याण कार्यक्रम थांबवण्याचा त्यांचा निर्णय सांगितला.अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइली यांना कामगार संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. एका कामगार संघटनेने २६ मार्च रोजी संप सुरू केला, तर सरकारी अहवालात जेवियर माइली यांनी डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यापासून खासगी क्षेत्रातील कामगारांच्या पगारात मोठी घसरण झाली आहे.
 
आर्थिक संकटातून जात असलेल्या देशाची अर्थव्यवस्था बदलण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आल्याचे जेवियर माइली यांच्या प्रशासनाने सांगितले. जेवियर माइली यांनी १० डिसेंबर २०२३ रोजी देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. गेल्या वर्षाच्या अखेरीस अर्जेंटिनातील महागाई २०० टक्क्यांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता होती. सरकारी नियम, निर्यात आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारी उद्योगांचे खासगीकरण करण्याची परवानगी देण्याचे आश्वासन जेवियर माइली यांनी निवडणुकीत दिले होते. या कर्मचारी कपातीला विरोध होत असला तरी माइली यांनी आपल्या धोरणांवर ठाम राहण्याची शपथ घेतली आहे.
 

सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करणार

 
अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष म्हणाले की देशाला पुर्नरचनेच्या मार्गावर नेणे, लोकांना स्वातंत्र्य आणि स्वायत्तता परत करणे आणि देशाच्या आर्थिक वाढीस अडथळा आणणारे नियम बदलणे हे त्यांचे ध्येय आहे.अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष देशात सुमारे ३०० बदल करणार आहेत. विविध सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करणे, भाडेकरू, कर्मचारी आणि दुकानदार यांच्यासाठी अनुकूल नियम बनवणे, ऊर्जा आणि वाहतूक अनुदान कमी करणे आणि काही सरकारी मंत्रालये बंद करणे या निर्णयांचा समावेश यात आहे. जेवियर माइली हे आक्षेपार्ह विधानांमुळे टेलिव्हिजन वाहिन्यांवर चर्चेत असतात. ते एक अर्थशास्त्रज्ञ आणि माजी राजकीय भाष्यकार आहेत ज्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल करण्याचे आश्वासन दिले होते. आर्थिक संकटामुळे निराश झालेल्या अर्जेंटिनाच्या जनतेच्या पाठिंब्याने त्यांची देशाच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.

Related Articles