देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी   

पिंपरी : भाविकांच्या अभंग गजरात बुधवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकड आरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ अशा भक्तिमय वातावरणात बीज सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत.जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदाचे बीज सोहळ्याचे ३७६ वर्षे आहे. 
 
देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या काना कोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. तुकाराम बीज निमित्त पहाटे देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि सर्व मोरे महाराजांच्या सपत्नीक उपस्थितीत संत तुकाराम महाराज शिळा मंदिर वैकुंठ मंदिराची तसेच नारायण महाराज यांची पूजा महाभिषेक करण्यात आला. पहाटे साडेचार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. पहाटे सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली.सकाळी साडेनऊ वाजता वैकुंठस्थानाचे कीर्तनास आरंभ झाला बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांचे कीर्तन झाले. 
 
पालखीचे सकाळी साडेदहा वाजता वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन झाले. दुपारी बारापर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले. दुपारी साडेबारा वाजता वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन झाले.
 
त्यानंतर मुख्य मंदिरातून पालखी घेऊन दिंडीकरी ,वंशज मोरे मंडळी देहूकर मंडळी व फडकरी मंडळी पालखी घेऊन वैकुंठस्थानाकडे गेले. दुपारी बारा वाजता वैकुंठ कीर्तनाचा फुले उधळून समारोप करण्यात आला. दुपारी बारा वाजता नांदूरकीचे झाड हलले आणि संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याची अनुभूती लाखो वारकऱ्यांनी घेतली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे आणि माणिक महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles