दहशतवादी हल्ल्याने बलुचिस्तान हादरले   

नौदल, हवाई दल केंद्र लक्ष्य; ४ दहशतवादी ठार 

 
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि पीएनएस सिद्दीकी या नौदलाच्या हवाई तळावर सोमवारी रात्री दहशदवाद्यांनी हल्ला केला. मात्र, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी हा हल्ला हाणून पाडत, चार बलुच दहशतवाद्यांचा खात्मा केला. 
 
पीएनएस सिद्दीकी हे तुर्बतमधील पाकिस्तानचे दुसरे सर्वांत मोठे नौदल हवाई  तळ आहे. या हवाई तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत स्फोटही घडवला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडने तुर्बतमधील नौदल हवाईतळावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
बलुचिस्तान प्रांतात चीनच्या गुंतवणुकीला माजिद ब्रिगेडचा विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान या प्रदेशातील मालमत्तेचे शोषण करत असल्याचा आरोप करत  बलुच दहशतवादी हवाई तळावर घुसले आहेत. हल्ल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी केच यांनी टीचिंग रूग्णालय तुर्बतमध्ये आणीबाणी लागू केली असून सर्व डॉक्टरांना तातडीने कामावर हजर राहण्यास सांगितले आहे.
 
तुर्बतमधील हा हल्ला बीएलए माजिद ब्रिगेडचा आठवड्यातील दुसरा आणि या वर्षातील तिसरा हल्ला आहे. यापूर्वी २९ जानेवारीला त्यांनी ग्वादरमधील लष्करी गुप्तचर मुख्यालय माच शहराला लक्ष्य केले. त्यानंतर २० मार्चला तुर्बतमधील पाकिस्तानच्या पीएनएस सिद्दीकी हवाई तळावर हल्ला केला होता. त्याच वेळी पाकिस्तानमधील ग्वादर बंदर प्राधिकरणमध्ये  स्फोट आणि गोळीबार झाल्यानंतर सुरू झालेल्या लढाईत किमान दोन पाकिस्तानी सैनिक आणि आठ अतिरेकी मारले गेले.
 

Related Articles