पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला; पाच चिनी अभियंत्यांसह सहा ठार   

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये मंगळवारी आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात पाच चिनी अभियंत्यांसह एका चालकाचा मृत्यू झाला. खैबर पख्तुनख्वामधील शांगला येथे ही घटना घडली.
 
पाकिस्तानमध्ये सलग दुसर्‍या दिवशी हा दहशतवादी हल्ला झाला आहे. खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या हल्ल्यात हल्लेखोराने अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी अभियंत्यांच्या ताफ्यात घुसवले आणि दुसर्‍या वाहनाला धडक दिली. मारले गेलेले चिनी अभियंते पाकिस्तानात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी काम करत होते. या हल्ल्यात काही लोक जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील वर्षीही पाकिस्तान मध्ये असे हल्ले झाले होते, ज्यामध्ये चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. विशेषत: पाकिस्तान आणि चीनचे संयुक्त प्रकल्प, चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला विरोध होत आहे, त्यामुळे हे हल्ले झाले आहेत, अशी चर्चा आहे.

Related Articles