गांधी किंवा गोडसे यांपैकी एकाची निवड करू शकत नाही   

भाजप उमेदवार गांगुली यांच्या विधानाने वाद  

 
कोलकाता : आपण महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या पैकी एकाची निवड करू शकत नाही, असे वादग्रस्त विधान कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भाजपचे उमेदवार अभिजीत गांगुली यांनी केले आहे. या  विधानाने ते वादात सापडले असून, काँग्रेसने त्यांची उमेदवारी मागे घेण्याची मागणी केली आहे. 
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली म्हणाले, विधी व्यवसायात असल्याने माझ्यासाठी घटनेची दुसरी बाजू समजून घेणे महत्त्वाचे असते. मी गांधी आणि गोडसे यांपैकी एकाची निवड करू शकत नाही. गांधी हत्येसाठी गोडसेंचे तर्क समजून घ्यावे लागतील. गोडसेंचे लेखन वाचावे लागेल आणि त्यांना महात्मा गांधींना का मारावे लागले? हे समजून घ्यावे लागेल. 
 
दरम्यान, गांगुली यांच्या या विधानावर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ज्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला,  त्यांना पंतप्रधानांचा थेट आशीर्वाद आहे! ते भाजपाचे उमेदवार आहेत. अशा व्यक्तीने गांधी किंवा गोडसे यांच्यापैकी एकाची निवड करू शकत नाही, असे म्हणणे संतापजनक आहे. हे अत्यंत वाईट असून, स्वीकारले जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीची उमेदवारी तात्काळ मागे घ्यायला हवी. 
 

Related Articles