सोनम वांगचूक यांचे उपोषण २१ दिवसांनंतर मागे   

लेह : लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करून त्याला राज्याचा दर्जा मिळावा आणि हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पाऊले उचलावीत या मागण्यांसाठी सोनम वांगचूक यांनी सुरू केलेले उपोषण मंगळवारी २१ दिवसांनंतर मागे घेतले. यावेळी लडाख येथील नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले. 
 
वांगचूक यांनी सहा मार्चला उपोषण सुरू करतानाच हे उपोषण २१ दिवसांचे असेल, असे स्पष्ट केले होते. उपोषणाच्या २१ दिवसांत त्यांनी केवळ मीठ आणि पाण्याचे सेवन केले. उपोषण सोडताना लडाखमधील हजारो नागरिक उपोषणस्थळी जमले होते. वांगचूक यांचा लढा आम्ही पुढे सुरू ठेवू, असा निर्धार यावेळी महिलांनी केला. वांगचूक हे शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असून ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘रँचो’ हे पात्र त्यांच्या आयुष्यावरच प्रेरित आहे. केंद्र सरकारने जनतेच्या भावनांचा विचार करून मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन वांगचूक यांनी केले. गोठवणारे तापमान असूनही लोक आंदोलन करत आहेत. हिमालयातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राजकीय नेते म्हणून पाहात नाहीत, तर धोरणकर्ते म्हणून पाहतो आहोत. त्यांनी याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे आवाहन वांगचूक यांनी केले.
 

Related Articles