महायुतीचे जागावाटप उद्या   

अजित पवार यांची माहिती; रायगडमधून सुनील तटकरे उमेदवार

 
पुणे : महायुतीतील जागावाटप ९९ टक्के पूर्ण झाले आहे. जागावाटपाबाबत महायुतीत कोणतेही गैरसमज नाहीत. उद्या (गुरूवारी) मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणाही पवार यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. उमेदवार बदलण्याच्या केवळ अफवा आहेत, असे ते म्हणाले.
 
पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपच्या २३ जागा निवडून आल्या.शिवसेनेच्या १८ आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. आम्ही नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते. तर एमआयएमची एक जागा अशा निवडून आल्या होत्या. 
 
मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत गैरसमज नाहीत. मित्रपक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे असेही त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एक - एक लोकसभा आणि आमदारांवर एक -एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बाकीची टिम आमचे काम करणारच आहे. शिवाय जिथे महायुतीचे उमेदवार असतील तिथे मंत्री व आमदारांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे असेही ठरल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
 
जाहीरनाम्यावर काम सुरू आहे तो लवकरच दिला जाईल. स्थानिक प्रश्न आहेत तेही त्या जाहीरनाम्यात यावेत, अशी भूमिका आहे. स्टार प्रचारक यादीवर एकत्र बसून चर्चा झाली आहे. त्यामुळे ती यादी लवकरच जाहीर होईल.राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचे नाव अगोदरच जाहीर केले आहे. अशा पध्दतीने आम्ही मतदारांसमोर जाणार असून त्यांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करु, असा निर्धार करण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.  शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील, असे ते म्हणाले.
 

आता राष्ट्रवादीला नाशिक हवे

 
नाशिकच्या जागेसाठी शिवसेना (शिंदे) आणि भाजपत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता सातार्‍याचा आग्रह सोडल्यानंतर राष्ट्रवादीने नाशिकवर दावा सांगितल्याने पेच वाढला आहे. राष्ट्रवादी बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या पाच जागा तर लढणारच आहे, याशिवाय काही अन्य जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
 

Related Articles