‘वंचित’मुळे रखडली ठाकरे गटाची यादी   

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत १५ उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याचे समजते. वंचितला अजूनही सोबत घेण्याचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाश आंबेडकर यांना आणखीन एका जागेची ऑफर देण्यात आल्याने ठाकरे गटाची उमेदवारांची घोषणा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी उमेदवारांची यादी होणार असल्याचे सांगितले होेते.
 
शिवसेना ठाकरे गटाची पहिली १५ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात येईल, असे खासदार संजय राऊत यांनीच स्पष्ट केले होते. ठाकरे गट २२ जागा लढविणार आहे. त्यातील १५ उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उर्वरित ७ जागांचे काय होणार ? हे त्यानंतर स्पष्ट होईल. ठाकरे गटाची यादी जाहीर झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर देखील पत्रकार परिषद घेणार होते; मात्र आघाडीकडून वंचितला आणखी एका जागेची ऑफर दिल्याचेे समजते. त्यावर विचार झाल्यानंतर बुधवारी ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होईल.
 
त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. वंचितचा आघाडीत समावेश होणार की नाही ? याबाबतचे घोंगडे भिजतच पडले आहे. आतापर्यंत झालेल्या घडामोडी पाहता वंचित आघाडीत येणार नाही हेच स्पष्ट होत आहे. आघाडीने वंचितला ४ जागांचा प्रस्ताव दिला होता. वंचितने आघाडीकडे ६ जागांची मागणी केली होती. आता वंचितला आणखी एका जागेचा प्रस्ताव दिल्याचे समजते. म्हणजेच ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव आघाडीने वंचितला दिला आहे. यावर वंचित आता काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
 

Related Articles