आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश   

मंचर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील   यांनी मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असतील. गुरूवारी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आढळराव पाटील यांच्यासोबत शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घड्याळ बांधले आहे. मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांचा पक्ष प्रवेश झाला. 
 
यावेळी अजित पवार म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजय करून दिल्लीत पाठवा. ते राष्ट्रवादीत आल्यामुळे पुणे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. विरोधकांच्या  चुकीच्या प्रचाराकडे लक्ष देऊ नका. सर्वांनी एक दिलाने कामाला लागा. आढळराव म्हणाले, लोकसभेत कांदा प्रश्न, बैलगाडा शर्यत या विषयांवर विद्यमान खासदार यांच्यापेक्षा तीन ते चार पट जास्त प्रश्न मांडले होते. मात्र हे मी कधी जनतेला सांगत नाही मला संवाद फेकाफेकी करता येत नाही, अशी टीका त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली. 
 
शिवाजी आढळरावांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची फौज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाली आहे. सगळ्यांनी अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. शिरुरमध्ये आता अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी तगडी लढत बघायला मिळणार आहे. ही लढत अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे अजित पवार या मतदारसंघात मोठी ताकद लावणार असल्याचे दिसत आहे. 
 

Related Articles