लाहोटीनगर परिसरात भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ   

सातारा, (प्रतिनिधी) : मलकापूर येथील लाहोटीनगर परिसरात मुक्काम ठोकला आहे. या परिसरात बिबट्याचा भरवस्तीत लपंडाव सुरू आहे. चारी बाजूने इमारती असून मध्येच शाळूच्या रानात इकडून-तिकडे धूम ठोकत सकाळी सात वाजता उघड्या रानात बिनधास्त संचार करत असल्याचे दर्शन झाले. शहरी भागात बिबट्याचा उघड वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
 
आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेकवेळा पाळीव प्राणी बिबट्याने ठार केले आहेत. गेल्या काही वर्षात चचेगाव, आगाशिवनगर, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या अनेकवेळा ठार केल्या. रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात किमान महिन्यातून एकदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समिकरणच झाले आहे. आगाशिव डोंगरालगत कांही शेतकर्‍यांना या बिबट्याच्या कळपाचे दर्शन झाले होते. आसपासच्या गावात वारंवार घडलेल्या घटना व जखिणवाडीत विहिरीत पडलेले दोन बिबट्याचे बछडे, त्याच पद्धतीने गेले कांही दिवसांपूर्वी समर्थनगर येथे सुरेश गणपतराव इंगवले यांच्या ऊसाच्या शेतात दोन बछडे आणि एक मादी बिबट्याचे वारंवार दर्शन झाले होते. दुसर्‍याच दिवशी घराजवळच पाळीव श्वानावर हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्याच्या कळपाने ऊसात धूम ठोकली. त्यावेळी तिसर्‍या दिवशी रात्री तर मोकळ्या रानातच फिरताना बिबट्याचे दर्शन झाले होते.
 
गणेश रेसिडेन्सी या इमारतीजवळ शेलार यांचे शाळूची शेती आहे. या परिसरात चारी बाजूने इमारती असून मध्येच शेती आहे. या मोकळ्या शेतातूनच रविवारी सकाळी सात वाजता बिबट्या इकडून तिकडे पळत असल्याचे निदर्शनास आले. इमारतीवरूनच कांहींनी चित्रफीत बनवली आहे. ही बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरली. सकाळनंतरचा गोंगाट व गर्दीचा आवाज ऐकून बिबट्याने शाळूच्या रानात धूम ठोकली.
 
भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
 

Related Articles