महावितरणला १५ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस   

नवीन रस्ता तिसर्‍या दिवशी खोदल्याने पुणेकर संतप्त 

 
पुणे : महापालिकेच्यावतीने सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिर ते पेरुगेट दरम्यान असलेल्या रस्त्यावर ११ मार्च रोजी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात महावितरणने महापालिकेच्या पथ विभागाला कोणतीही पूर्व कल्पना देता रस्त्याची खोदाई केली आहे. त्यावर पुणेकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर पथ विभागाकडून महावितरणला खुलासा मागवला जाणार असून १५ लाख दंड वसुलीची कारवाई केली जाणार असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावस्कर यांनी सांगितले.
 
महापालिकेकडून करण्यात येणार्‍या रस्त्यावर खोदाई करण्यात येणार नाही, असे पथ विभागाने स्पष्ट केले होते. परंतु पथ विभागाने स्वत:च तयार केलेला नियम फाट्यावर मारून महावितरणला रस्ता खोदाई करण्याची परवानगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पथ विभागाच रस्ते खोदाईच्या विरोधात उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. टिळक रस्त्यावरचे ११ मार्च रोजी डांबरीकरण करण्यात आल्यानंतर ९० मीटर भागांवर खोदाई करण्यासाठी महावितरणला पालिकेकडून परवानगी देण्यात आली. तर १५ मार्चपासून ही खोदाई करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेच्या पथ विभागाचा हा अजब कारभाराचा नमुना समोर आल्यानंतर पुणेकरांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार सजग नागरिक मंचाने उघडकीस आणत याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. करदात्या पुणेकरांच्या कररूपी पैशांचा हा अपव्यय असल्याचे मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले. ‘एक रस्ता एक एकक’ योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे.
 
पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकार्‍यांमध्येच समन्वय नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. या खोदाईला परवानगी देणारे आणि डांबरीकरण करणारे अधिकारी यांच्यात याविषयी संवाद अथवा समन्वय न झाल्याने पालिकेचे नुकसान झाले आहे. नागरिकांना शहरात अशा प्रकारच्या खोदाईमुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच खड्डे आणि असमतल रस्त्यांमुळे मणक्याचे त्रास जाणवत आहेत. पालिकेकडून पुणेकरांच्या कराच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. हा अनागोंदी कारभार सुरू असून पैशांचा अपव्यय टाळण्याकरिता ‘एक रस्ता एक एकक’ योजना राबविण्याच्या केलेल्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. मागील १५ वर्षांपासून पुणेकर या फुसक्या घोषणांना वैतागले आहेत. या गैरप्रकारांना काळा घालण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली जाण्याची आवश्यकता वेलणकर यांनी व्यक्त केली.
 
महावितरण रस्ता खोदाईला परवानगी यापूर्वीच मागितली होती. त्यानुसार रस्ता खोदाईची परवानगी देण्यात आली होती. मात्र महावितरणने कोणतेही चलन भरले नव्हते. दरम्यान रस्ता खराब झाल्याने डांबरीकरण करण्यात आले होते. नेमके महावितरणने चलन भरले, त्यानंतर मात्र पथ विभागाला कोणतीही कल्पना न देता तसेच अभियंत्याकडून आखणी करुन न घेता थेट रस्त्याची खोदाई केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महावितरणला काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. रस्ता खोदाई प्रकरणी महावितरणकडून खुलास मागविला जाणार आहे. तसेच तीन पट दंड लावला जाणार आहे. महावितरणने या कामासाठी ५ लाख रुपयांची अनामत रक्कम भरली होती. ती जप्त केली असून आणखी १० लाख रुपये भरण्यास सांगितले जाणार आहेत. पथ विभाग आणि इतर विभागामध्ये समन्वय आहे.
 
- अनिरुध्द पावस्कर, पथ विभाग प्रमुख, महापालिका.
 

Related Articles