टँकरचालकांकडून पाण्याची नासाडी   

खराडी : पुणे शहरात नागरिकांना उन्हाच्या अधिक झळ जाणवत आहेत. यंदा उन्हाळा कडक असल्याचे समोर येत आहे. शिवाय महाराष्ट्राच्या अनेक गावांत लोकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र पुणे महानगरपालिकेच्या वाडगावशेरी पंपिंग स्टेशनमध्ये पाणी भरण्यासाठी येत असलेले टँकरचालक पाण्याची नासाडी करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पंपिंग स्टेशनचे केंद्र प्रमुख आणि टँकर चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
 
वडगावशेरी पंपिंग केंद्रातून रोज शेकडो टँकर भरून अनेक सोसायटींना पोहोचवित आहेत. परंतु टँकरमध्ये पाणी भरताना हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. टँकर मधून पाणी खाली पडत असल्याने अक्षरश: केंद्राच्या परिसरात पाण्याचे मोठे डोह निर्माण झाले आहेत. तरी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. शिवाय रस्त्यावर खड्डे सतत पडत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. 
 
पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी बचतीसाठी उपाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी बचतीसाठी पालिकेचे काही अधिकारी विशेष प्रयत्न करत आहेत. मात्र  टँकरमध्ये  पाणी भरताना  टाकीतून जोपर्यंत पाणी बाहेर पडत नाही, तोपर्यंत पाणी टँकरमध्ये  भरण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे कित्येक लिटर पाणी वाया जाते. तसेच वॉल पूर्ण बंद होत नसल्याने पाणी वाहत असते.
 
पाण्याची नासाडी करणार्‍या केंद्र प्रमुख, कर्मचारी, जबाबदार अधिकारी, तसेच टँकरचा ठेकेदार, चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
 

Related Articles