विजयानंतर बंगळुरुच्या खेळाडूंचा जल्लोष   

बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात पंजाब किंग्स संघाला ४ बळीने पराभूत केले. हा आयपीएलच्या १७ व्या हंगामातील बंगळुरूचा पहिलाच विजय ठरला. त्यातच हा विजय बंगळुरूने घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मिळवला. त्यामुळे बंगळुरूने विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये मोठा जल्लोष केला. याचा व्हिडिओ बंगळुरूने सोशल मीडियावरही शेअर केला आहे.
 
दिनेश कार्तिकची फिनिशिंग, विराटचा मास्टरक्लास, महिपालचा इम्पॅक्ट, सिराजचे वचन आणि यशचे सातत्य - सामन्यांनंतरचा कौतुक सोहळा,’ अशा अर्थाचे कॅप्शन बंगळुरूने व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दिसते की खेळाडू विजयाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. त्यानंतर बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी संघातील खेळाडूंचे कौतुक केले. त्यांनी सिराज, यश दयाल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, विराट कोहली, अनुज रावत अशा बंगळुरु संघातील खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी संघातील खेळाडू बंगळुरुच्या संघाचे गाणे गायले. या व्हिडिओला सध्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. झालेल्या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी केली होती. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७६ धावा केल्या.
पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली, तर जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, सॅम करन आणि शशांक सिंग यांनी छोटेखानी खेळी केल्या. 
 
बंगळुरूकडून  सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतल्या. त्यानंतर १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग बंगळुरुने १९.२ षटकात ६ बळी गमावून १६३ धावा करत पूर्ण केला. बंगळुरुकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. तसेच अखेरीस मोक्याच्या क्षणी दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी नाबाद ४८ धावांची नाबाद भागीदारी करत बंगळुरुच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्तिकने १० चेंडूत नाबाद २८ धावा केल्या, तर महिपाल लोमरोरने १७ धावांची खेळी केली. पंजाबकडून कागिसो रबाडा आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २ बळी घेतल्या.
 

Related Articles