धोका कायम (अग्रलेख)   

घटनेनंतर अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी आयसिसचे नाव घेतले आणि त्याचवेळी युक्रेनचा या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. रशियाच्या दृष्टीने ते खटकणारे होते. 
 
रशियाची राजधानी मॉस्कोवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला जेवढा धक्कादायक तेवढाच तो अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. हल्ल्यामागे आयसिस की युक्रेन? याचा संभ्रम संपलेला नाही. दहशतवादी संघटनांचे अस्तित्व संपलेले तर नाहीच, उलट मोठ्या क्षमतेने या संघटना हल्ला चढवू शकतात, ही वस्तुस्थिती यानिमित्ताने स्पष्ट झाली आहे. मॉस्कोतील क्रोकस सिटी हॉलमध्ये एका रॉक ग्रुपच्या कार्यक्रमाला दहशतवाद्यांनी लक्ष्य बनविले. संगीताचा हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेले श्रोते दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात मोठ्या संख्येने बळी पडले. भारतासह जगभरातील देशांनी या घृणास्पद हल्ल्याचा निषेध केला. एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा भडका थांबायला तयार नाही, दुसर्‍या बाजूला रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर मॉस्कोतील हल्ला संघर्षाचे चटके आणखी वाढविणारा ठरेल. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार आणि पाकिस्तान यांच्यातील चिघळलेले संबंध भूराजकीय अस्वस्थतेचा परिघ आणखी मोठा करत आहेत. अल कायदाने अमेरिकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचा दहशतवादाकडे पाहण्याचा ‘निवडक’ दृष्टीकोन काहीसा बदलला; मात्र अमेरिकेसह बडे देश आपापल्या हितसंबंधांसाठी दहशतवादाचा पूर्ण बिमोड करणार नाहीत, किंबहुना गरजपूर्तीसाठी अशा संघटना अथवा गट सुरक्षित कसे राहतील, हेच त्यांच्याकडून पाहिले जाते. इस्रायलला हादरवून सोडणारे हल्ले करण्याची ताकद हमासमध्ये कशी? अशा प्रश्नांची उत्तरे महासत्तांच्या खेळामध्येच आहेत. युक्रेन युद्धात नको एवढा रस घेणार्‍या अमेरिकेला रोखण्यासाठी हमासचा वापर करण्यात आला, असे उघडपणे बोलले गेले. त्यावेळी हमासने इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेला गाफिल ठेवले. यावेळी शक्तीशाली केजीबी आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रभावहीन ठरली. रशियात अन्यत्र हल्ले होणे आणि मॉस्कोत ते घडवून आणणे यात फरक आहे. मॉस्कोतील घटना सर्वशक्तीमान व्लादिमिर पुतिन यांच्या प्रतिष्ठेला आव्हान देणारी म्हणावी लागेल. 
 

संभ्रम कायम

 
इस्लामिक स्टेट - खोरासन अर्थात आयसिस के या दहशतवादी संघटनेने मॉस्कोतील हल्ल्याची जबाबदारी घेतली. मात्र, रशिया ते मानण्यास तयार नाही. दहशतवाद्यांना युक्रेनमध्ये प्रशिक्षण देण्यात आले, संपूर्ण घटनेमागे युक्रेनचाच हात आहे, अशी भूमिका रशियाने घेतली आहे. ही गुंतागुंत वाढण्यास अमेरिका देखील तेवढीच जबाबदार म्हणता येईल. अमेरिकेच्या रशियातील दूतावासाने ‘मॉस्कोसह रशियातील मोठ्या शहरांमध्ये होणार्‍या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे टाळावे‘ अशा सूचना आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना दिल्या होत्या. जेव्हा या प्रकारची खात्रीशीर माहिती अथवा सबळ संशय असेल त्यावेळी संबंधित देशाच्या सुरक्षा यंत्रणेला सावध करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे आपण रशियाला सावध केले होते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेने युक्रेनला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणे रशियाला रूचले नाही. त्यातूनच ’युक्रेनच्या समर्थनार्थ येणारा अमेरिकेचा प्रत्येक शब्द हल्ल्याचा पुरावा मानला जाईल’ हे विधान करण्यात आले. महासत्तांमधील अविश्वास कोणत्या पातळीवर पोहोचला आहे हे यातून दिसते. याचबरोबर दहशतवादी संघटनांना बळ का मिळते, याचेही उत्तर त्यात दडले आहे. मॉस्कोतील हल्ल्यामुळे रशिया युक्रेनच्या विरोधात आणि अर्थातच अमेरिकेसह ‘नाटो’च्या सदस्य देशांविरुद्ध अधिक आक्रमक होणार, अशी चिन्हे आहेत. रशियाचा सीरियामधील हस्तक्षेप हे आयसिसने घडविलेल्या दहशतवादी कृत्याचे कारण दिले जाते. सीरियात तेथील अध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधात आयसिसचा संघर्ष सुरु असून रशियाने अध्यक्षांच्या मागे उभे केले आहे. हल्ल्यामागचे सांगितले जाणारे हे कारण संयुक्तिक वाटत नसले तरी भारतासह सर्वांनीच दक्ष राहण्याचा संदेश यातून मिळतो. दहशतवादाचा धोका कायम आहे, हेच मॉस्कोतील हल्ला सांगतो. 
 

Related Articles