मुलांच्या वाटा समृद्ध करूया   

ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

 
पालक आणि शिक्षकंहो, आपण मुलांच्या सोबत काम करीत आहोत. त्या कामात मुले आपली सोबत करीत आहेत. ते कदाचित प्रत्यक्षपणे आपल्या सोबत कामाला हात लावत नसले, मदत करीत नसले तरी ते आपल्या सोबतच असतात. आपले मुलांवरती प्रेम असेल तर त्यांची सोबतही कामात आनंद देत असते. मुलांची सोबत म्हणजे अडचण, अडथळा नाहीच मुळी, त्यांची सोबत म्हणजे मोठ्यांसाठी उर्जा असते, उत्साह असतो. अर्थात यासाठी मुलांच्या सोबत मुले होणे महत्त्वाचे असते. आपण मुलांसोबत काम करताना आपल्याला आऩंद मिळतो का? आणि तो जर मिळत नसेल तर त्या कामात कोणताही राम नाही हे लक्षात घ्यायला हवे. मुलांचा सहवास म्हणजे निखळ आऩंदाचा खळखळता झरा असतो. त्यांचा सहवास म्हणजे जीवनातील समस्या निराकरणाची जादू असते. मुलं म्हणजे निखळ आऩंद असतो. त्याच्या सोबतच्या प्रवासात आपल्या चिंता हरवून टाकतो. मुलांसोबत लहान होणे म्हणजे आपल्या जीवनाच्या प्रवासाची दोरी लांबविणे आहे. मुले त्यांच्या सोबतच्या असलेल्या प्रत्येकाला निखळ आऩंद वाटत असतात. त्यांच्या सहवासात असाल तर आपल्याला त्रागा करावा लागत नाही. मुलांच्या सहवासात एकदा मोठ्यांनी लहान होऊन पाहण्याची गरज आहे.
 
मोठे म्हणून आपण आपल्या उपदेशाच्या अधिकाराचे जतन करीत असतो. वयाने मोठे झालेल्या प्रत्येकाला काही अधिकार मिळत असतात. मोठेपणात काही एक गृहीतक असते. आपण छोट्यांना उपदेश करताना जे काही सांगत आहोत ते जर त्यांना सांगणार्‍या माणसांत दिसले, तरच सांगणार्‍यांचे ते ऐकत असतात. मुलं तुमच्या शब्दांतून व्यक्त होण्याचा जो विचार असतो ते ऐकत नसतात, तर तुमचे वर्तन जे काही सांगत असते त्याचे अनुकरण करत असतात. मुले शब्दांचा नाही तर वर्तनाचा आवाज ऐकत असतात. वर्तनाचा आवाज म्हणजे मोठ्यांसाठी आतला आवाज असतो. मोठ्यांना जे पटते तेच ते स्वीकारतात. त्यामुळे मोठे जसे वर्तन करतात, तसेच मुले आपले वर्तन करीत असतात. त्यामुळे छोटी मुले म्हणजे मोठ्यांसाठी आरसा असतो. मुलं शब्दाने जितके शिकत नाही, त्यापेक्षा अधिक अनुकरणाने शिकत असतात. मोठी माणसे ही जबाबदार असतात हे विद्यार्थी जाणून असतात. त्यामुळे मोठी माणसे जसे वागतात, तसेच वागण्याकडचा कल बालकांचा असतो. त्यामुळे आपण काय सांगतो यापेक्षा कसे वागतो? याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवन वर्तनावर होत असतो.
 
जेव्हा मुलांसोबत काम करताना आऩंद मिळत नाही, तेव्हा त्यात मुलांचा दोष नसतो, तर दोष असतो तो मोठ्यांचा. मुले आपल्या कामात अत्यंत प्रामाणिक असतात. त्यांना तुम्ही जे काही सांगाल ते अत्यंत प्रामाणिकपणे करतील यात शंका नाही. मुले कधीच कामचुकार नसतातच मुळी. मात्र ते मोठ्यांच्या सहवासात जसे जसे अधिक काळ राहू लागतात आणि त्यांच्याकडे पाहूनच ते शिकू लागतात. हळूहळू मोठ्यांचे अनुकरण करू लागतात. मुले ऐकून फार कमी शिकतात. त्या उलट ती ‘पाहूनच’ जास्त शिकत असतात. एकवेळ मोठी माणसे आपल्या वर्तनात प्रामाणिक असतीलच असे नाही. मात्र लहान मुले कधीच अप्रामाणिक असत नाहीत. त्यांचा अप्रामाणिकपणा जो मोठ्यांना दिसतो ते वर्तन मोठ्यांच्या वर्तनाची सावली असते. लहान मुले आपल्या घरी, आपल्या भोवतांमध्ये मोठी माणसे कशी वागत आहेत याचे निरीक्षण करत असतात. केवळ शाळेतील निरीक्षणाच्या आधारे मुले आपले वर्तन ठरवत नाहीत, तर ते ज्या परिसरात राहतात त्या परिसर असलेल्या विविध प्रसंगातील परिस्थितीत असलेल्या मोठ्या माणसांचे वर्तन यांचे निरीक्षण करत असतात. त्यातील जे निरीक्षण त्यांना भावते त्याच वाटेने चालण्याचा प्रयत्न मुले करत असतात. मोठी माणसे समाजात बरेच काही शिकतात आणि शिकवितात देखील. त्यामुळे मुलांच्या सहवासात राहायचे असेल आणि काही पेरणी करायची असेल तर मोठ्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी असते. आपण जे बोलायचे असते, तसेच वागायचेही असते हे लक्षात घ्यायला हवे. तुकोबांच्या भाषेत मुलांच्या सोबत काम करताना आणि उपदेशाचे डोस पाजताना बोले तैसा चाले.. या न्यायाचे वर्तन हवे.
 
मुलांच्या सोबत काम करताना छोट्यांपेक्षा मोठ्यांना अधिक प्रामाणिक राहावे लागते. याचे कारण मोठी माणसे आदर्शाची पाऊलवाट सांगत राहतात. उपदेशाचे ठोस पाजणे जगात कोणाही साठी अत्यंत सोपे काम आहे. त्यातल्या त्यात छोटी बालके म्हणजे उपदेश पाजण्यासाठीची जागा असते. त्यांच्यासाठी उपदेशाचे स्रोत नेहमीच तयार असतात. मुलांना उपदेश करण्याइतके जगात स्वस्त असे दुसरे काही नाहीच; मात्र त्यांना कोणी उपदेश करीत असते तेव्हा ते बिचारी ऐकून घेतात. बालके आपल्या बोलण्याचा अत्यंत गंभीरपणे विचार करीत असतात. त्यांचे आपल्या बोलण्याकडे जितके लक्ष असते त्यापेक्षा अधिक लक्ष हे आपल्या वर्तनाकडे असते हे लक्षात घ्यायला हवे. एकदा एक आजीबाई आपला नातू गोड खातो म्हणून महात्मा गांधी यांच्याकडे भेटण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. गांधीजी आपल्या नातवाला काही गोष्टी सांगतील आणि मुलाच्या वर्तनात बदल होईल अशी तिची अपेक्षा होती. त्या आजीबाई  गांधीजींना भेटल्या. गांधीजींनी येण्याचे कारण विचारले तर त्या म्हणाल्या, हा माझा नातू. तो खूप गोड खातो. त्याला तुम्ही काहीतरी समजून सांगा. एवढे ऐकल्यावर गांधी म्हणाले, आता पुढील आठवड्यात या. मग त्याला समजून सांगू. आजीबाई पुन्हा ठरल्याप्रमाणे पुढील आठवड्यात आल्या. त्यांनी पुन्हा आपले गार्‍हाणे गांधीजींकडे मांडले. तेव्हा गांधीजी त्या मुलाकडे पाहत त्याला म्हणाले, बाळा गोड खात जाऊ नये आणि संवाद थांबला. त्या आजीबाईंना प्रश्न पडला जर एवढेच सांगायचे होते, तर हे मागील आठवड्यात पण सांगता आले असते. मग हे आठ दिवसांनी बोलावून का बरे गांधीजींनी सांगितले? 
 
हा प्रश्न आजीबाईंच्या मनात सतत डोकावत होता. अखेर न राहून त्यांनी गांधीजींना विचारलेच. तुम्ही या एका वाक्याचा उपदेश करण्यासाठी आठ दिवस का घेतले? तेव्हा गांधीजी म्हणाले, तुम्ही जेव्हा मुलाची तक्रार घेऊन आलात, तेव्हा मीच खूप गोड खात होतो. आता मी गोड खाणे कमी केले आहे. त्यामुळे मी गोड कमी खा हे सांगण्याच्या पात्रतेचा झालो आहे. म्हणून आता मी त्याला सांगत आहे. मूळतः कोरडा उपदेशाचा डोस कधीच कोणालाही पचनी पडत नाही. अनेकदा लोक म्हणतातही मी खूप प्रयत्न केले; पण परिणाम झाला नाही. मोबाइलमध्ये सतत डोके घालून बसलेला माणूस कितीही म्हणाला मोबाइलचा उपयोग करू नको, तर त्याचा परिणाम साधला जाण्याची शक्यता अजिबात नसते. आपण सांगून जेव्हा समोरच्यावर परिणाम होत नाही तेव्हा समजावे आपला उपदेश आचरण शून्य आणि कोरडा आहे.
 
सर्वदूर मुले आमचे ऐकत नाही अशी तक्रार असते. पूर्वीची मुले फार चांगली होती. ते सांगतील ते ऐकत होती; मात्र सध्या असे घडत नाही. या म्हणण्यामागे मुले बिघडली असा दृष्टीकोऩ अधोरेखित होत असतो; पण पूर्वी सांगणारी माणसे आचरणाची होती हे आपण का बरं विसरतो? आपण जेव्हा सांगण्याची पात्रता कमावतो तेव्हाच मुले ऐकत असतात. गांधीजींनी अधिकार मिळविला म्हणून मुलाने ऐकले. मग ते सांगणे कितीही साधे, सरळ असले तरी त्याचा परिणाम होत असतो. अन्यथा तुम्ही कितीही रसाळ आणि शब्दांचा फुलोरा उभा केला तरी परिणाम साधला जात नाही. मुळात सांगणार्‍याची प्रतिमा आणि प्रतिभा या विचाराप्रमाणे वर्तनात प्रतिबिंबित होत असतील तरच संवाद फुलतो आणि परिणामकारक ठरतो. जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी चळवळी उभ्या केल्या, त्या सर्व नेत्यांनी ती वाट चालताना स्वतःत बदल घडविले होते. त्यामुळे  आपण ज्या मार्गाने जात नाही त्या मार्गाने मुलांनी जावे असे वाटत असेल तर ती कधीच जाणार नाही. ती गेल्यासारखी कदाचित दाखवतील आणि आपल्याला तसे वाटेलही; पण तो केवळ भास असेल. त्यामुळे मुलांना फुकाचा उपदेश न करणे हेच मोठ्यांच्या हिताचे आहे. मुलांसाठीच्या वाटा आदर्शाच्या उभ्या करण्यापेक्षा आपल्याच वाटा आदर्शाच्या चालायला हव्यात. त्या जितक्या चालत जाऊ तितक्या प्रमाणात मागील पिढी आपल्या मागे चालत येतील. संस्कृतमध्ये म्हटले जाते, महाजनः येन गतःस पंथः.मोठी माणसं ज्या वाटेने चालतात त्याच वाटेने छोटी मुले चालत असतात हे लक्षात घ्यायला हवे. आपण या छोट्या मुलांसोबत जेव्हा काम करीत असतो, तेव्हा त्यांच्यासोबत काम करणे हे मोठ्यांसाठी कठीण असते त्या यामुळेच. आपल्याला मुलांना वाचता यायला हवे. त्यांच्या स्वभाव ओळखणेदेखील महत्त्वाचे असते. आपल्याला वरवर त्यांना जाणता येऊन चालणार नाही. मुलांना आंतरिकदृष्ट्या समजून घेता आले पाहिजे. मूल समजावून घेणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. प्रत्येक मूल भिन्न असते आणि त्यांची प्रकृतीदेखील भिन्न असते. त्यांच्या वर्तनामागे त्याचा विशिष्ट दृष्टिकोन असतो. कदाचित त्यांच्या वर्तनामागे असलेला दृष्टिकोन आपल्या दृष्टिकोनात प्रतिबिंबित होणार नाही. म्हणून त्याचे वर्तन चुकीचे असते असे नाही. त्यांना आपण अत्यंत आदराने वागवायला हवे. त्यांना मान दिला तर ते आपल्याला मान देतील. प्रत्येक मूल स्वतंत्र व्यक्ती आहेत. ते मूल मोठ्यांची प्रतिकृती आहे असे अजिबात नाही. आपण जे पेरतो तेच उगवते हा निसर्गाचा नियम आहे हे लक्षात घेऊन चालत राहायला हवे. मुलांशी वागताना निसर्ग नियमाचा विचार करण्याची गरज आहे. मुलांवरती विश्वास ठेवणे आणि त्यांचेवरती प्रेम करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे; मात्र ती तितकीच कठीण गोष्ट आहे. मुलांना प्रेमाची सवय लावणे आणि त्यांच्यावरची विश्वास दृढ करणे इतके सहज आणि सोपे काम नाही. आपल्याला त्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. शेवटी मुले समजून घेणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्यांना जाणता आले की, त्यांच्या वाटा जितक्या निर्मळ होतात तितक्याच वाटा आपल्याही अधिक निर्मळ होतात. 
 
आपण त्या वाटेने जाण्यासाठी आपलीच वाट अधिक कठीण आहे. ती आपण चालत राहिलो तर त्यांच्याही वाटा ते चालत राहतील. म्हणून आपणच मुलांच्या वाटा समृद्ध करण्याकरिता चालत राहायला हवे आणि परिश्रम घ्यायला हवेत. त्या वाटा कठीण आहेत; पण असाध्य नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. गिजूभाई म्हणतात, योग्य परिश्रम, मुलांसोबत काम करणे अवघड आहे. मुलाचा स्वभाव ओळखणे, त्याच्या भावना स्थिर करणे आणि त्याला मान देणे ही गरज आहे. मुलावरचा विश्वास आणि प्रेम या कठीण बाबी त्यासाठी तुम्हाला घाम गाळावा लागेल. ही घाम गाळण्याची प्रक्रिया अधिक कठीण असले तरी अशक्य मात्र नाही; मात्र असे प्रयत्न आपण करू शकलो तर उद्याची पिढी आधी सक्षम सुदृढ, आणि मूल्याधिष्ठित घडल्याशिवाय राहणार नाही.
 

Related Articles