व्हॉट्सऍप कट्टा   

उद्या (गुरूवारी) तिथीने शिवजयंती. यानिमित्त...
 
एक प्रमाणित भेट
 
११ मे २००७ रोजी प्रिंन्स ऑफ वेल्स म्युझियम, फोर्ट मुंबई (आजचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) येथे पत्रव्यवहार केला होता. माहिती सोबत मी स्वतः लाकडी कोळश्यातून कार्व्हिंग करून साकारलेली त्रिमीतीय मंदिर शिल्पे व स्मारके यांचे फोटो रजिस्टर पोष्टाने त्यांच्या कार्यालयाला पाठविली होती. पत्रामध्ये प्राचीन भारतीय वारसा आणि ठेवा हा शिल्परूपात जपण्याचा अल्पसा प्रयत्न आहे असे नमूद केलेले होते. १४ जून २००७ रोजी तेथील क्युरेटर, वंदना प्रपन्ना यांचे पत्र मिळाले. (जप-११७/५५१) आपण मुंबईला आल्यास आपल्या कलाकृतीबद्दल जाणून घेण्यात व शक्य झाल्यास पहाण्यास आम्हाला आनंदच होईल असा उल्लेख होता. त्याकाळी माझे कुटुंब नौकरीनिमित्त मेळघाटच्या आदिवासी भागात वास्तव्य करीत असल्यामुळे तेथीलच एक रहिवासी भारतीय वारसा व त्या अनुषंगाची शिल्पकृती जपत आहे. या सहानुभूतीने त्यांनी माझ्या पत्राची दखल घेतली असे वाटते. मी सर्व अडथळे पार करीत दि. १० ऑगस्ट २००७ रोजी कलाकृतींसह त्यांच्या कार्यालयात पोहोचलो. कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे त्या देखील अचंबित झाल्या, परंतु त्यांचे कार्यालयीन पत्र जावक रजिस्टरमध्ये नोंद असल्यामुळे त्यांना मला संचालक डॉ. सव्यसाची मुखर्जी यांच्याकडे न्यावे लागले. त्यांनी माझे कौतुक केले व आश्वस्त करीत मला आपल्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र दिले. हे संस्थेशी कोणताही संबंध नसणार्‍या बाह्य व्यक्तीला दिलेले एकमेव प्रमाणपत्र असावे. मी नेलेल्या कलाकृती सुखरूप बाहेर नेण्यासाठी त्यांना खूप सोपस्कर पार पाडावे लागले याची खंत वाटली. दुर्मिळ व मौल्यवान वस्तूंचे संग्रहालय असल्यामुळे आवक-जावक वस्तूची काटेकोरपणे नोंद ठेवावी लागते असे ते म्हणाले. राज्य सरकार ज्यांना सुपूर्द करणार आहे त्याच संचालकांनी त्यांच्या हातांनी मला प्रमाणपत्र दिले त्याच हातांनी ते ‘वाघनखे’ देखील स्वीकारणार आहे ही भावना कृतार्थ करणारी आहे.
 
सुमंत मुरलीधर देव, जुनीवस्ती, बडनेरा
--
आली आली रंगपंचमी
 
जाऊ रंगात रंगून सारे 
माणुसकी उन्माळ्याचे 
नात्यांच्याच आदराने
प्रेम रंग जिव्हाळ्याचे 
 
रंग उधळूया आनंदाचे
प्रत्येकाच्या दीप मनी
आलीआली रंगपंचमी
सुख समृद्धीचा धनी
 
खोटा मुखवटा हास्याचा 
धारण करून वावरतो 
विनोदावर खळखळून हसतो
जनमानसात दुःख लपवतो
 
आली महामारी जगात 
वारे वाहती प्रदुषणाचे
बेरोजगारी वाढत जाई
जीवन बेरंगी दुःखाचे 
 
कोणी नाही सुखी आता 
प्रत्येकाच्या संकट घरात
रोगराई, पैशाची विवंचना 
आनंदाचे विरजण मनात 
 
रोहिणी अमोल पराडकर 
मो. ९७६७७२५५५२
 
आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलं पाहिजे,
कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कमनिशिबी असतं,
ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका,
स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या!
---
गण्याची बायको आलू पराठे करते
गण्या : यात आलू कुठंच दिसत नाही?
बायको : गपचूप गिळा!
काश्मिरी पुलाव मध्ये काश्मीर दिसतं का?
---------------------------
पुस्तकाचं ’मैत्र’..
 
पुस्तकांचं मैत्र, कधीचं असतं
चित्रं ,गीतांतून कधीसं जुळतं
शब्द ,गोष्टीतून वहात राहतं
हाती हात धरून घट्ट मिरवतं
हवं त्या तीरी, अलगद विसावतं..
 
पुस्तक ना , इमानदार असतं
’मूडस’ ची खातेदारी  टाळतं
सोयीस्कर ’कारणं’ देत नसतं
 हाक ऐकुनी धावून येतं.. हवं....
 
कधी प्रश्नोत्तरं , खेळ मांडतं
सात- सागरा पारही नेतं
ध्येय मार्ग  कधी गोचर करतं
अस्थिर ,स्वैर ’मन’ रिझवतं.. हवं
 
संस्कृती, संथ प्रवाहित करतं  
वीण , वेद- संवादु जोडतं
कथा , पुराणे जागर करतं
उपनिषदें, कवाड खोलतं.. हवं
 
 भावनेशी जवळीक साधतं
अज्ञात ज्ञान पैलू दावीतं
क्षणभंगुर स्वप्नांचे जीवीत  
माणसात, मनू घडवीतं.. ..हवं..
 
कविता मेहेंदळे, मो.९३२६६५७०२७
--
शेजारच्या घरातून साजूक तूप-जिर्‍याच्या फोडणीचा सुगंध येत होता. कॅलेंडरमध्ये पाहिलं. आज चतुर्थी आहे हे समजलं. मग मी एक मध्यम आकाराचा डबा घेतला. त्यात अर्धा डझन केळी घालून शेजारच्या काकूंकडे गेलो. गावाकडची स्पेशल देशी केळी खास तुमच्यासाठी आणलीत असं सांगितलं. तब्बेतीची चौकशी केली. काकू बारीक दिसत आहेत असंही सांगितलं. काकू खुश झाल्या. घरी परतलो आणि सोफ्यावर पाय पसरून फेसबुक वाचू लागलो. अपेक्षेप्रमाणे पाचच मिनिटात बेल वाजली. मी आनंदाने दार उघडलं. काकू डबा परत द्यायला आल्या होत्या! मी स्मितहास्य करत डबा घेतला. दार बंद करून खमंग साबुदाणा खिचडी खायला सज्ज झालो. डबा उघडताच निराश झालो. काकूंनी दोन मोठी उकडलेली रताळी घालून डबा परत केला होता. कोल्हापूरच्या युक्त्या पुण्यात चालत नाहीत याचा पुनःप्रत्यय आला.
--
शेजारी पाजारी म्हणजे काय?
अडीनडीच्या वेळी डाळ तांदूळ तेल वगैरे देणारे ते शेजारी...
आणि अडीनडीच्या वेळी व्हिस्की, बिअर,वाइन वगैरे देणारे ते पाजारी!

Related Articles