अभिनेते धीरज कुमार यांचे निधन   

मुंबई : पंजाबी आणि हिंंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.मनोज कुमार यांच्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यापैकी रोटी कपडा और मकान, क्रांती चित्रपटातील अभिनयामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
 
दूरचित्रवाणीवरील ओम नम: शिवाय आणि अदालत आदी मालिकांची निर्मिती त्यांनी केली होती. त्या गाजल्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.   
धीरज कुमार गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होते. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील अति दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ताप, सर्दी आणि खोकल्यामुळे त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल केले होते.  त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. धीरज कुमार यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास पाच दशकांचा होता. 1965 चा काळ महानायक राजेश खन्ना आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांचा होता त्या काळात ते त्यांना एक स्पर्धक म्हणून उतरले होते.    
 
पंजाबीबरोबरच हिंदी चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला. 1970 मध्ये प्रदर्शित झालेला रातो का राजा हा त्यांचा पहिला चित्रपट होता.  रोटी कपडा और मकान (1974), सरगम (1979) आणि क्रांती (1981), दीदार, बहारोें फूल बरसाओ, शराफत छोड दी मैंने, माँग भरो सजना मध्ये ते प्रमुख अभिनेते होते. 1970 ते 1984 दरम्यान पंजाबी चित्रपटसृष्टीतील ते मुख्य अभिनेते होते. त्यांनी 20 चित्रपटांत काम केले. 1986 मध्ये क्रिएटिव्ह आय ही स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. त्याद्वारे दूरदर्शनवर कौटुंबिक आणि पौराणिक मालिकांची निर्मिती केली. त्यात ओम नम: शिवाय या मालिकेचा समावेश होता. दूरदर्शनवर ती 1997 ते 2001 दरम्यान दाखवली गेली. यानंतर. श्री गणेश, संस्कार, रिश्तों के भंवर मे उलझी नियती, धूप छाँव, सिंहासन बत्तीशी, अदालत आणि घर की लक्ष्मी बेटियाँ मालिका प्रदर्शित झाल्या. त्यापैकी अदालत मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Related Articles