हरिकृष्णन बनला भारताचा ८७ व्या ग्रँडमास्टर   

चेन्नई : जिंकण्याची दृढनिश्चय आणि समर्पित भावनेने खेळ करताना भारताच्या हरिकृष्णन ए. रा. याने भारताचा ८७ व्या ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळविला आहे.स्वित्झर्लंड आणि स्पेनमध्ये दोन पात्रता निकष (नॉर्म) मिळविल्यानंतर चेन्नईच्या हरिकृष्णन ए. रा. याने फ्रान्स येथील स्पर्धेत तिसरा आवश्यक ‘नॉर्म’ मिळवून तीन महिन्यापूर्वी प्रशिक्षक श्याम सुंदर यांना दिलेला शब्द खरा केला. युरोपमधील स्पर्धा खेळून आपण ग्रँडमास्टर बनूनच मायदेशी परत येईन असा शब्द हरिकृष्णनने दिला होता. फ्रान्स येथील प्लाग्न आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात २३ वर्षीय हरिकृष्णनने ग्रँडमास्टरचा तिसरा ‘नॉर्म’ मिळविला. हरिकृष्णन ८७वा भारतीय आणि तमिळनाडूचा ३२वा ग्रँडमास्टर ठरला. 
 
वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात करणार्‍या हरिकृष्णनने जुलै २०२३ मध्ये स्वित्झर्लंड येथील स्पर्धेत पहिला ‘नॉर्म’ मिळविला. त्यानंतर दुसरा ‘नॉर्म’ त्याने स्पेनमधील स्पर्धेत मिळविला. समर्पित भावनेने खेळण्याच्या प्रवृत्तीने वयाच्या सातव्या वर्षीय त्याने ‘फिडे’ गुणांकन मिळविले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय युवा खेळाडू ठरला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविला. अर्थात, ग्रँडमास्टर बनण्यासाठी त्याला आठ वर्षे वाट बघावी लागली.

Related Articles