बिहारमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या   

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे भाजप नेते सुरेंद्र केवट यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.सुरेंद्र केवट रविवारी सकाळी शेखपूरा जिल्ह्यातील शेतामध्ये पाण्याचा पंप बंद करण्यासाठी गेले होते. शेतावरून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या गोळीबारात केवट हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना चार गोळ्या  लागल्या होत्या. त्यांना तात्काळ पाटणा येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, केवट यांचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. 
 
घटनेनंतर भाजप आमदार गोपाल रवीदास आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी रुग्णालयात भेट देऊन केवट कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनी रुग्णालय प्रशासनास तातडीने शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी  मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर पाटण्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पाटण्यामध्ये एका भाजपाच्या पदाधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या झाली. काय बोलावे आणि कोणाला बोलावे? एनडीए सरकारमधील कोणी सत्य ऐकण्यास किंवा त्यांच्या चुका मान्य करण्यास तयार आहे का? मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल सर्वांना माहिती आहे; पण भाजपाचे दोन निरुपयोगी उपमुख्यमंत्री काय करत आहेत?, अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी टीका केली.

Related Articles