अमेरिकेत आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक   

एफबीआयची बटाला टोळीवर कारवाई

वॉशिंग्टन : अमेरिकेत बसून भारतात दहशतवादी हल्ले करण्याचे कारस्थान रचणार्‍या आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित एका टोळीवर कारवाई करण्यात आली. अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने बटाला टोळीच्या प्रमुखासह आठ जणांना अटक केली आहे. या संदर्भातील माहिती एफबीआयच्या वतीने रविवारी देण्यात आली.
 
पंजाबचा कुख्यात गुंड पवित्र सिंग बटाला हा टोळीचा म्होरक्या आहे. तो अमेरिकेत पळून गेला होता. तेव्हापासून भारताची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) त्याच्या मागावर आहे. मोस्ट वॉन्टेड यादीत त्याचे नाव देखील आहे. त्याला आणि त्यांच्या टोळीतील सात सदस्यांना एफबीआयने अखेर अटक केली आहे. 
 
पवित्र बटाला हा बंदी घातलेली दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असल्याचा आरोप आहे. संघटना कॅलिफोर्नियात कार्यरत आहेत. या संघटनेच्या अनेकांचा आणि बटाला याचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. त्यामुळे तो भारताला हवा आहे  त्याच्यासह आठ दहशतवाद्यांना अटक केल्यामुळे त्यांना भारताकडे सोपविण्याचा मार्ग अधिक मोकळा होण्यास मदत मिळणार आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बटाला व्यतिरिक्त, इतर संशयितांची ओळख पटली आहे. त्यात दिलप्रीत सिंग, अमृतपाल सिंग, अर्शप्रीत सिंग, मनप्रीत रंधावा, सरबजीत सिंग, गुरताज सिंग आणि विशाल नामक एका व्यक्तीचा समावेश आहे. त्याने त्याचे आडनाव सांगितले नाही. सर्व आरोपींवर अपहरण, छळ, चुकीच्या पद्धतीने नागरिकांना बंदिवासात ठेवणे, साक्षीदाराला धमकावणे अर्धस्वयंचलित बंदुकीने हल्ला करणे आणि गुन्हेगारी धमक्या देणे यासारखे अनेक आरोप ठेवण्यात आले होते. त्यांना अटक करुन सॅन जोआक्विन काउंटी तुरुंगात पाठवण्यात आले.

पोलिस काय म्हणाले?

सॅन जोआक्विन काउंटी शेरीफ कार्यालयाच्या एजीनेट युनिटने, स्टॉकटन पोलिस डिपार्टमेंची स्वाट टीम, मँटेका पोलिस डिपार्टमेंटच्या स्वाट टीम, स्टॅनिस्लॉस काउंटी शेरीफ कार्यालयाच्या स्वाट टीम आणि एफबीआयच्या स्वाट टीम यांनी  ११ जुलै २०२५ रोजी संयुक्तपणे कारवाइर्ंत भाग घेतला होता टोळीचा माग काढण्यासाठी सॅन जोआक्विन काउंटीमध्ये पाच वॉरंट काढले होते., असे शेरीफ कार्यालयाने शनिवारी सांगितले.

हरप्रीतला भारताकडे सोपविणार 

खलिस्तान समर्थक दहशतवादी आणि आयएसआयचा प्रमुख साथीदार हरप्रीत सिंग उर्फ हॅपी पसिया याला लवकरच अमेरिका भारताकडेे सोपविणार आहे. त्याला १७ एप्रिल रोजी कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे अटक केली होती. सध्या तो अमेरिकेतील तुरुंगात आहे. एफबीआयचे प्रमुख काश पटेल यांनी त्याच्या अटकेचे कौतुक केले आहे. हरप्रीत सिंग हा अमेरिकेत बेकायदा राहात होता. एका परदेशी टोळीशी त्याचे संबंध होते. पोलिस ठाण्यांवरील अनेक हल्ल्याच्या नियोजनात त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने त्याला अटक करण्यात यश मिळाल्याची पोस्ट पटेल यांनी एक्सवर नुकतीच टाकली आहे. 
 

Related Articles