इराणकडून ५ लाख अफगाण नागरिकांची हकालपट्टी   

तेहरान : इराणमध्ये बेकायदा वास्तव्य करणार्‍या पाच लाखांहून अधिक अफगाण नागरिकांची इराणने हकालपट्टी केली आहे. मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेल्या इराणी हद्दपारी धोरणांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे.२४ जून ते ९ जुलै दरम्यान तब्बल ५ लाख ८ हजार ४२६ अफगाण नागरिकांना इराणने देशाबाहेर काढले आहे. यापैकी बहुतेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये बेकायदा वास्तव्य करत होेते. काही दिवसांपूर्वी इराणमधून एका दिवसात ५१ हजार अफगाण लोकांना हाकलून लावण्यात आले होते. इराणने वैध कागदपत्रे नसलेल्या अफगाण नागरिकांनी देश सोडावा, असे आवाहनही यापूर्वी केले होते.
 
हे अफगाण नागरिक तेहरान, मशहाद आणि इस्फहान या शहरांमध्ये बांधकाम कामगार, साफसफाई कामगार म्हणून आणि शेतमजूर म्हणून कमी वेतनात काम करतात. मात्र आता या कामगारांना मायदेशात परतावे लागले आहे. अफगाणिस्तानमध्ये आधीच बेराजगारी आहे, त्यामुळे आता या नागरिकांना पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. 
 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि तज्ज्ञांनी या मोहिमेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून, ही एक प्रकारची सामूहिक शिक्षा असून राजकीय फायद्यासाठी दुबळ्या लोकसंख्येला बळीचा बकरा बनवण्या सारखे आहे, असे म्हटले आहे.
 

Related Articles