अँडरसन फिलिपने पकडला सर्वोत्तम झेल   

जमैका : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौर्‍यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेल्या अँडरसन फिलिपने हवेत झेप घेत भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 
 
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये डे नाईट कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात अँडरसन फिलिप हा बदली क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात आला. त्याने हा झेल पहिल्या डावातील ६५ व्या षटकात घेतला. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्ह्स गोलंदाजीला आला. ग्रीव्ह्सने षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. हा चेंडू हेडने कव्हर्सच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. पण अँडरसन फिलिप मिड ऑफवरून धावत आला आणि हवेत झेप घेतली.
 
या शानदार झेलसह ट्रॅव्हिस हेड २० धावांवर माघारी परतला. या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोन्ही संघांमध्ये तिसर्‍या कसोटीचा थरार सुरू आहे. शनिवारी या सामन्याचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव २२५ धावांवर आटोपला. वेस्ट इंडिज कडून गोलंदाजी करताना जोसेफ चमकला. त्याने ४ गडी बाद केले. तर जस्टिन ग्रीव्ह्स आणि जेडन सीलेस यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा संघ या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तर कॅमरून ग्रीनने ४६, ट्रॅव्हिस हेडने २०, उस्मान ख्वाजाने २३ आणि लेक्स कॅरीने २१ धावा केल्या.
 
वेस्टइंडिजच्या गोलंदाजांनी या सामन्यात दमदार गोलंदाजी केली. पण वेस्टइंडिजच्या फलंदाजांना या डावात हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. वेस्टइंडिजकडून ब्रेंडन किंग आणि केवलन अँडरसनची जोडी मैदानावर आली.या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पण वेस्टइंडिजला 11 धावांवर पहिला मोठा धक्का बसला. केवलन अँडरसनला मिचेल स्टार्कने त्रिफळाचित करत माघारी धाडले. तो अवघ्या ३ धावा करत माघारी परतला. पहिल्या दिवसाअखेर वेस्टइंडिजला १ गडी बाद १६ धावा करता आल्या आहेत.

Related Articles