कोण आहेत सी. सदानंद मास्टर?   

उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.  
राज्यसभेवर नियुक्त झालेले सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्टर नेमके कोण आहेत? 

सी. सदानंदन मास्टर 

सी. सदानंदन मास्टर राष्ट्रीय शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि ’नॅशनल टीचर्स न्यूज’चे संपादक देखील आहेत. सी. सदानंदन मास्टर यांचा जन्म केरळमधील कन्नूर जिल्ह्यात झाला. केरळमधील अनेक कुटुंबांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबावरही डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. मात्र, वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले आणि स्वयंसेवक बनले. 

राजकीय हल्ल्यात गमावले दोन्ही पाय 

२५ जानेवारी १९९४ रोजी त्यांच्या कन्नूर जिल्ह्यातील निवासस्थानाजवळ राजकीय विरोधकांनी सदानंदन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सदानंदन मास्टर यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले. त्यावेळी ते केवळ ३० वर्षांचे होते. हा हल्ला डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यानंतरही सदानंदन मास्टर यांनी आपले राजकीय आणि सामाजिक कार्य थांबवले नाही. त्यांनी त्या परिस्थितीतूनही पुन्हा उभे राहून आपला संघर्ष सुरूच ठेवला.

समाजसेवेतील योगदान 

सदानंदन मास्टर यांनी आपले जीवन समाजसेवा आणि शिक्षणाला समर्पित केले आहे. ते केरळमधील एक प्रसिद्ध शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी समाजातील दुर्बळ घटकांसाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांची नियुक्ती हे त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेचे आणि शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे समाजातील अनेक लोकांना प्रेरणा मिळेल आणि संघर्षमय परिस्थितीतही सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा मिळेल.
 

Related Articles