अवकाशवीर शुभांशू मंगळवारी परतणार पृथ्वीवर   

नवी दिल्ली : भारतीय अवकाशवीर शुभांशू शुक्ला मंगळवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील १८ दिवसांचा मुक्काम आटोपून पृथ्वीवर परतणार आहेत. दरम्यान, शुक्ला यांच्यासह त्यांचे तीन सह अवकाशवीर सात दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होत आहेत.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील शुक्ला यांचा मुक्काम १८ दिवसांचा होता. कॅलिफोर्निया किनारपट्टी जवळच्या समुद्रात ते १५ जुलै रोजी उतरणार आहेत. शुक्ला यांच्यासह अन्य तीन अवकाशवीर आहेत. त्यामध्ये कमांडर पॅगे व्हिटसन आणि मोहीम विशेषज्ञ स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की आणि टिबोर कापू हे अनुक्रमे पोलंड आणि हंगेरीचे आहेत. 
 
२६ जून रोजी चारही अवकाशवीरांनी जॉन एफ. केनेडी अवकाश केंद्रावरून व्यावसायिक अ‍ॅक्सिओम-४ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. त्यांचा मुक्कामाचा कालावधी संपत आहे. त्यामुळे चौघेही सोमवारी १४ जुलै रोजी अंतराळ स्थानकातून सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी बाहेर पडणार आहेत. तत्पूर्वी ते दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ड्रॅगन कॅप्सूल अवकाश यानात बसतील, त्यांची आरोग्य चाचणी देखील घेतली जाईल, अशी माहिती अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने दिली.भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनुसार अवकाशवीर ड्रॅगन कॅप्सूलमधून  प्रवास करत १५ जुलै रोजी ते कॅलिफोर्निया किनारपट्टीजवळील समुद्रात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उतरतील. यानंतर अवकाशवीर सात दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होतील. त्या माध्यमातून ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये कसे वावरायचे याचे धडे घेतील.. 
 
शुभांशू शुक्ला यांच्या अवकाश सफरीसाठी इस्रोला ५५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. अंतराळ स्थानकातील शुक्ला यांच्या अनुभवाचा फायदा भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी करून घेतला जाणार आहे. गगनयान मोहिमेतून २०२७ अखेरपर्यंत पहिला भारतीय अवकाशवीर अवकाशात पाठवण्यात येणार आहे. शुक्ला यांच्या आरोग्यावर इस्रो लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पृथ्वीभोवती २८ हजार किलोमीटर प्रति तास या वेगाने फिरत आहे. ड्रॅगन कॅप्सूलमध्ये बसून अवकाशवीर हळूहळू पृथ्वीच्या दिशेने प्रवास करणार आहेत. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्यांचे यान कॅलिफोर्निया किनारपट्टी जवळील समुद्रात उतरणार आहे. अवकाश यानाचे वजन ५८० पाऊंडहून अधिक आहे. त्यात नासाची हार्डवेअर आणि माहितीचा साठा आहे. जो  त्यांनी १८ दिवस ६० प्रयोगांच्या माध्यमातून गोळा केला आहे.

Related Articles