धर्मांतराची टोळी चालवणारा छांगुर बाबा   

धर्मांतर घडवून आणणारी टोळी चालवल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या बलरामपुरमध्ये जलालुद्दीन ऊर्फ छांगुर बाबाला अटक करण्यात आली. एकेकाळी भीक मागणार्‍या या बाबाकडे परदेशी निधीतून जमवलेली जवळपास ३०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. छांगुर बाबा आणि त्याच्या सहकार्‍यांची ४० हून अधिक बँक खाती पोलिसांच्या हाती लागली असून, त्या खात्यांमधून १०६ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे या बाबाच्या मालमत्तेची चौकशी आता ईडीकडे सोपविण्यात आली आहे. 
 
छांगुर बाबा
 
छांगुर बाबाचे खरे नाव जमालुद्दीन आहे. तो उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील रेहरा माफी गावचा रहिवासी आहे. त्याच्या पत्नीचे नाव कुतुबुनिशा असून, त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. एकेकाळी भीक मागणारा आणि २०१०  नंतर सायकलवर रत्ने विकणारा हा बाबा मुंबईतील हाजी अली दर्ग्यात जात होता. तिथून त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. हळूहळू तो स्वतःला आध्यात्मिक बाबा म्हणवू लागला. २०२० मध्ये कोरोना काळात तो मुंबईत आला. सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या दर्ग्यावर त्याची नीतू आणि तिचे पती नवीन रोहरा यांची भेट झाली. या दोघांच्या माध्यमातून या बाबाने धर्मांतराचा व्यवसाय सुरू केला. आपल्या चमत्कारिक उपचारांनी आणि प्रार्थनांनी हजारो लोकांना प्रभावित केले आणि हळूहळू ३ ते ४ गैर-मुस्लिम नागरिकांचे धर्मांतर केले.
 
सरकारी जमिनीवर ताबा 
 
या बाबाने मध्यपूर गावातील सरकारी जमीन हडप करून त्यावर आलिशान हवेली बांधली होती. त्यामध्ये जवळपास वीस खोल्या होत्या. सुसज्ज नियंत्रण कक्ष, स्वतंत्र बैठक खोली, आणि शयनकक्षाचाही समावेश होता. त्याच्या खोलीमध्ये स्नायूंना बळकटी देण्यासाठी स्पेनमधून आयात केलेले तेल आणि शक्तिवर्धक गोळ्याही सापडल्या आहेत. ५ जुलै रोजी बाबाच्या अटकेनंतर ती हवेली बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. हा बाबा विलासी जीवन जगत होता. त्याच्या ताफ्यात आलिशान गाड्याही होत्या. 
 
कसे चालवले जात होते रॅकेट?
 
धार्मिक प्रवचन, चमत्कारिक उपचार आणि आश्चर्यकारक चमत्कारांच्या नावाखाली हा बाबा नागरिकांना आकर्षित करत. मग हळूहळू त्यांच्यावर मानसिक प्रभाव पडून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडायचा. त्यासाठी त्यांना आर्थिक आमिषही दाखवायचा. अनेकांना धर्मांतरासाठी धमकावायचाही. बाबाची मुख्य सहकारी नीतू ऊर्फ नसरीन हिलाही पोलिसांनी अटक केली आहे, ती नवीन रोहरा या व्यावसायिकाची पत्नी होती. धर्मांतरानंतर ती छांगुर बाबांकडे राहू लागली आणि त्याला या धंद्यात मदत करू लागली.
 
चार हजार नागरिकांचे धर्मांतर
 
गरीब, असाहाय्य कामगार, दुर्बल घटक आणि विधवा महिलांना आर्थिक आमिष दाखवून, तसेच काहींना लग्नाचे आश्वासन देऊन किंवा धमकी देऊन त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. छांगूर बाबाने आत्तापर्यंत सुमारे ४ हजार नागरिकांचे धर्मांतर केले आहे. त्यामध्ये दीड हजारहून अधिक महिलांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय धर्मांतर करणारी टोळी तयार करणे हे बाबाचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्याने भारत-नेपाळ सीमेवर इस्लामिक औषध केंद्र बांधण्याची तयारी सुरू केली होती.
 
परदेशी निधीतून करोडोंची कमाई
 
छांगुर बाबा धर्मांतरासाठी परदेशी निधी मिळवत होता. धर्मांतरासाठी त्याच्याकडे जातीवर आधारित रक्कम निश्चित होती. छांगुर आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या ४० हून अधिक बँक खात्यांमधून १०६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले. त्यामधून त्याला आखाती देशांकडूनही निधी मिळाल्याचे दिसून आले. 
 
आतापर्यंतची कारवाई
 
५ जुलै रोजी लखनौ येथून छांगुर बाबा आणि नीतू रोहरा ऊर्फ नसरीन यांना अटक करण्यात आली. १६ जुलैपर्यंत त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे, त्या दरम्यान एटीएस त्यांची समोरासमोर चौकशी करेल. बाबाच्या घरातून संवेदनशील कागदपत्रे, परदेशी व्यवहारांचे पुरावे आणि उच्च तंत्रज्ञानाची पाळत ठेवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ईडीने आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बँक खाती आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Related Articles