हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे २४९ रस्ते बंद   

सिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे २४९ रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत, त्यापैकी २०७ रस्ते मंडी जिल्ह्यातील आहेत. दरड कोसळण्याच्या  सर्वाधिक घटना या रस्त्यांवर घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे, मंडी ते धरमपूर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग-३ जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
 
शुक्रवारी रात्री उशिरा मंडीतील पांडोह धरणाजवळील कैची वळणावर दरड कोसळल्यामुळे चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गाचा मंडी-कुल्ल्ाू विभाग जवळपास १० तास बंद ठेवावा लागला. यानंतर वाहतूक कातुला-कामंद या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. डोंगरावरून रस्त्यावर पडणारे मातीचे ढिगारे आण दगड  हटवल्यानंतर या १० तासांनंतर रस्त्यावर एकेरी वाहतूक पूर्ववत झाली.
 
हिमाचल प्रदेशात २० जून रोजी मान्सूनचे आगमन झाल्यापासून आतापर्यंत  पावसामुळे ७५१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरनुसार राज्यात ४६३ वीज ट्रान्सफॉर्मर आणि ७८१ पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. राज्यात सामान्यपेक्षा २६ टक्के जास्त पाऊस पडला आहे. पुराच्या ३१ घटना, ढगफुटीच्या २२ आणि दरड कोसळण्याच्या १७ घटना घडल्या आहेत. 
 
शुक्रवारी संध्याकाळपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. मुरारी देवी येथे सर्वाधिक १२६ मिलिमीटर पाऊस पडला. पांडोहमध्ये ७९, स्लेपरमध्ये ६७.७, कोठीमध्ये ६०.४, मंडीमध्ये ५३.२, जोगिंदरनगरमध्ये ५३, भुंतरमध्ये ४७.६, भरारीमध्ये ४०, सराहनमध्ये ३५, नेरीमध्ये ३४ आणि सुंदरनगरमध्ये ३०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Related Articles