केंद्राचा रोजगार निर्मितीवर भर : मोदी   

नवी दिल्ली : गेल्या अकरा वर्षांत देशाने विविध क्षेत्रांत मोठी प्रगती केली असून सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात रोजगाराची निर्मिती व्हावी, यासाठी केंद्र सरकारचा भर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी शनिवारी सांगितले. रोजगार मेळाव्यात काल ५१ हजार जणांना नियुक्ती पत्रांचे वितरण आभासी पद्धतीने झाले. त्या प्रसंगी मोदी बोलत होते. ते म्हणाले,  विविध कल्याणकारी योजनांचा लाभ चार कोटी घरातील गरीबांना झाला आहे. दहा कोटी स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी किंवा र्सार ऊर्जा प्रकल्प राबविले आहेत. त्या माध्यमातून रोजगाराच्या लाखो नव्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत २५ कोटींहून अधिक नागरिकांना गरीबीतून बाहेर काढले आहे. रोजगार आणि उत्पन्नांची साधनांची निर्मिती केल्यामुळे हे शक्य झाले. गरीबांनी खडतर जीवनाल तोंड दिले. मृत्यूचे भय सतावत असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. मार्ग काढून गरीबीचा पराभव केला आहे. 
 
ते म्हणाले, सरकारने उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ११ वर्षांत इलेक्ट्रॉनिकउत्पादनात पाचपट वाढ झाली असून मोबाइल निर्मिती केंद्रांची संख्या आता ३०० च्या आसापास आहे. पूर्वी ती दोन ते चार एवढीच होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरनंतर स्वदेशी संरक्षण साहित्य निर्मितीवर अभिमानाने चर्चा झाली. स्वदेशी शस्त्रांनी पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय सामर्थ्याची चुणूक जगाने पाहिली. सव्वा लाख कोटींहून अधिक संरक्षण साहित्याचे उत्पादन झाले. पाच देशांच्या दौर्‍यात भारताच्या बलाढ्य लोकसंख्याशास्त्राचे आणि सदृढ लोकशाहीकडे जगाचे लक्ष वेधले. तरुण देशाची शक्ती असून देशाचे उज्ज्वल  भवितव्य घडविण्याची ते हमी देतात. रोजगार मेळाव्यातून तरुणांना नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत, नियुक्तीपत्रे मिळाल्यामुळे त्यांच्या आशा आणि आकांक्षांना नवे पंख फुटणार आहेत. आतापर्यत दहा लाख नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.

Related Articles