श्योपूर : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी आठ वर्षांच्या एका चित्ता मादीचा मृत्यू झाला. नाभा,असे तिचे नाव आहे. आठवड्यापूर्वी ती शिकारीवेळी जखमी झाली होती. शरीरातील डाव्या भागात दोन ठिकाणची हाडे दुभंगली होती तसेच अंगावर जखमा देखील होत्या, अशी माहिती चित्ता प्रकल्पाचे संचालक उत्तम शर्मा यांनी दिली. शर्मा म्हणाले, आठवडाभर उपचार सुरू होते. मात्र गंभीर जखमांमुळे,तिचा मृत्यू झाला. पुढील तपासणीनंतर मृत्यूचे कारण उघड होणार आहे. नाभाच्या मृत्युमुळे कुनो उद्यानातील चित्त्यांची संख्या आता २६ झाली आहे. त्यामध्ये ९ प्रौढ चित्ते असून त्यात सहा मादी आणि तीन नर आहेत. उद्यानात १७ छाव्यांचा जन्म झाला आहे. छाव्यांची प्रकृती चांगली आहे. पैकी दोन चित्त्यांना गांधीसागर येथे हलविले आहे. २६ पैकी १६ चित्ते वनक्षेत्रात वावरत आहेत. त्यांनी स्वत:ला वाातावरणाशी जुळवून घेतले असून सहकार्य करुन ते जीवन जगण्याची आणि शिकार करण्याची कलाही आत्मसात केली आहे. सर्वांना अँटी-एक्टो-पॅरासिटिक औषधे दिली आहेत. वीरा आणि निरवा यांनी नुकताच छाव्यांना जन्म दिला आहे. त्यंची प्रकृती चांगली असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
Fans
Followers