मंचर शहरात डासांमुळे आजारांचा प्रादुर्भाव   

आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची गरज

मंचर,(प्रतिनिधी) : मंचर शहर आणि परिसरात बखळ जागेत मोठ्या प्रमाणात पावसामुळे गवत वाढले आहे. तसेच काही डबक्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी मंचर नगरपंचायतने खबरदारी घेऊन तातडीने उपाययोजना केल्यास भविष्यात येणारे साथीचे रोग टळण्यासाठी मदत होईल, अशी मागणी मंचर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी केली आहे.
 
खोकला, ताप, सर्दी, जुलाब, उलट्या, अशक्तपणा यामुळे काही जण त्रस्त आहेत. मुख्यत्वे करून डासांपासून होणार्‍या आजारांमुळे नागरिक हैराण झाले असून मंचर शहरात ठिकठिकाणी असलेले कचर्‍यामुळे डासाची उत्पत्ती होत आहे. कचर्‍याच्या ढीगाबरोबरच ठिकाणी पावसामुळे पाण्याची डबकी साचली असून काही सोसायटीचे सांडपाणी, ड्रेनेज, गटारे उघडी असल्याने या ठिकाणी डासाची उत्पत्ती होत आहे. नगरपंचायत प्रशासनाने पहाटेच्या सुमारास कचरा उचलून न्यावा, ठिकाणे निर्जंतुक फवारणी करावी तसेच शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगवले आहे. गटारे, पाईपलाइन उघडी असेल तेथे धुरळणी करावी. म्हणजे भविष्यात साथीचे आजार होणार नाही. 
 
नागरिकांनी कचराकुंडीत किंवा कचरा नेण्यासाठी वाहने आल्यानंतरच त्यामध्ये कचरा टाकावा. उघड्यावर कचरा टाकू नये. मच्छर वाढण्यासाठी मदत होईल. यासाठी कोणीही कचरा उघड्यावर टाकू नये. अन्यथा नगरपंचायतीच्या वतीने उघड्यावर कचरा टाकणार्‍याच्या विरोधात कारवाई केली जाईल. सद्य:स्थितीत शहरात कोणतीही आजाराची साथ नाही. मंचरकरांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मंचर नगरपंचायत नेहमीच दक्ष आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
-राजश्री मोरे, आरोग्य विभाग प्रमुख, मंचर 

Related Articles