संस्थाचालकाच्या मारहाणीत पालकाचा मृत्यू   

परभणी : शाळेची उर्वरित फी भरण्याच्या वादातून संस्था चालकाने केलेल्या मारहाणीत एका विद्याथिनीच्या वडिलांचा मृत्यू झाला. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे असलेल्या हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
काही दिवसांपूर्वी परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरी इयत्तेत केला होता. मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मुलीने मला गावातील शाळेतच प्रवेश घ्या असा हट्ट धरला. त्यानंतर तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे आपल्या मुलीचा दाखला काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले. 
 
दाखला घेते वेळी काही अ‍ॅडमिशन फीस देखील त्यांनी भरली होती. परंतु भरलेले पैसे हे कमी आहेत आणि पूर्ण अ‍ॅडमिशन फी भरावी असे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर प्रभाकर चव्हाण आणि त्याच्या पत्नीने त्यांना बेदम मारहाण केली. यात हेंडगे यांचा जागीच मृत्यू झाला.परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांच्यावर उखळद गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मुजोर संस्थाचालकावर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याची संस्थाही बंद करण्यात यावी, अशी मागणी जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास  करत आहेत.

Related Articles