नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण   

मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उड्डाण करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. या विमानतळावर जगातील सर्वांत जलद बॅग क्लेम सिस्टीम विकसित करण्यात यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिली.मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी काल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी केली. ही पाहणी करताना त्यांनी विशेषतः विमान प्रवाशांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. 
 
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किसन जावळे आदी उपस्थित होते. या पाहणीनंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना प्रकल्पाच्या सद्य:स्थितीविषयी माहिती दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १ आणि २ टप्प्यामध्ये २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे. हे विमानतळ सप्टेंबर २०२५ मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज होत आहे. या विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles