जागतिक वारसा टिकविण्यासाठी किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे तोडा   

राज यांची मागणी

मुंबई,  (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.  मात्र, नीट काळजी घेतली नाही तर हा दर्जा काढूनही घेतला जाऊ शकतो, हे महाराष्ट्र सरकारने लक्षात ठेवावे. तसेच, जात-धर्म न पाहता राज्य सरकारने या सर्व गडकिल्ल्यांवरची अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडून टाकावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
 
राज यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या १२ किल्ल्यांमध्ये ११ महाराष्ट्रातील आणि एक तामिळनाडूमधील आहे. या निमित्ताने शिवाजी महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहोचला होता, हे महाराष्ट्राचे कर्तृत्व यावर बोलणार्‍यांना कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल, असेही राज यांनी म्हटले आहे. 
 
युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचे संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील. पण, त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles