संन्यस्त खड्ग नाटकावर वंचितचा आक्षेप   

घोषणाबाजी करत प्रयोग बंद पाडला

पुणे : संन्यस्त खड्ग या नाटकाचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग सुरू  असताना ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात प्रवेश करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अचानक घोषणा सुरू झाल्यामुळे नाट्यगृहात गोंधळ उडाला. विशेष म्हणजे नंतर दोन्ही बाजूने घोषणा सुरू झाल्याने गोंधळात भर पडली. 
 
वि. दा. सावरकरांनी लिहिलेल्या ’संन्यस्त खड्ग’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ‘वंचित’चे कार्यकर्ते नाट्यगृहात गेले. या नाटकात गौतम बुद्धांची अवहेलना करण्यात आली असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी या नाटकाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यास विरोध म्हणून नाट्यगृहातील लोकांनीही ‘वंचित’च्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे हा प्रयोग थांबवावा लागला. 
 
संन्यस्त खड्ग हे नाटक गौतम बुद्धांच्या चरित्रावर आधारित आहे. तथागत गौतम बुद्धांची बदनामी करणे, त्यांच्या विचारांची विटंबना करणे हाच मुख्य हेतू या नाटकाचा आहे. त्यामुळे या नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही, अशी भूमिका ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी घेतली. याआधीही या नाटकाच्या प्रयोगावर आक्षेप घेण्यात आला होता. काल पुहा नाटकाचा प्रयोग ठेवल्याने ‘वंचित’चे कार्यकर्ते संतप्त झाले होते. 
 
नाटकाचे प्रयोग होऊ देणार नाही
 
संन्यस्त खड्ग या नाटकाचा मुंबईत प्रयोग झाल्यानंतर समाज माध्यमांवर आक्षेप नोंदविणार्‍या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे या नाटकाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांची बदनामी करू नका, असे आम्ही सांगितले होते. समतेचा आणि बुद्धांचा विचार येथे रूजणार, त्या व्यतिरिक्त इतर कोणते विचार आम्ही येथे रूजू देणार नाही. हिच वंचितची भूमिका आहे. गौतम बुद्धांचा अवमान करणारी, त्यांच्या विचारांची टिंगल करणारी घटना आम्ही सहन करणार नाही. या नाटकावर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे करणार आहोत.
- सिद्धार्थ मोकळे, प्रवक्ते, वंचित

Related Articles