गिरीश प्रभुणे यांना समाजसेवेत ईश्वर दिसला   

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्या जोशी यांचे गौरवोद्गार

पिंपरी : ’विचारांची भिन्नत असतानाही वेगवेगळ्या लोकांसोबत गिरीश प्रभुणे यांनी काम केले. त्यांची समाजाशी भक्ती आहे.  त्यांना समाजसेवेत ईश्वर दिसला. कर्म मार्गावर त्यांनी वाटचाल केली. त्यांचे कार्ये एक तप, साधना, व्रत आहे. अंतःकरणातील ईश्वराच्या बळावर त्यांनी आदर्श काम केल्याचे’ गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्या जोशी यांनी काढले.
 
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री  प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शनिवारी आयोजित  सोहळ्यात ते बोलत होते. जोशी यांच्या हस्ते प्रभुणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र भोळे लिखित गिरीश प्रभुणे ’जसे कळले तसे’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला अरुंधती प्रभुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, पद्मश्री रमेश पतंगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, डॉ.सुनिल भंडगे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ड सतिश गोरडे, कोषाध्यक्ष रवी नामदे  उपस्थित होते.
 
भैय्या जोशी म्हणाले, ’चाकोरीवर, मळलेल्या वाटेवर चालणे सोपे असते.अंधारात उडी घेऊन साहशी काम करण्याचे कार्य गिरीश प्रभुणे यांनी केले. प्रकाश आहे हा विश्वास ठेवून त्यांनी काम केले. समाजाचे प्रश्न बघण्यासाठी अंतकरणातून लागणारी दृष्टी त्यांच्याकडे आहे. प्रश्नांचे अध्ययन, सखोल मांडणी करून समाज सुधारण्यासाठी मन गुंतावे लागते. काय केले पाहिजे हे त्यांना समजले. त्यातून यमगरवाडीचा प्रकल्प उभारला. . कामे करताना अनेकदा ठेच लागली. प्रत्येक ठेच त्यांना पुढे जाण्याची दिशा देत गेली. त्यांचे अंतःकरणातील ईश्वराच्या बळावर त्यांनी आदर्श काम केले. भटके, विमुक्त यांच्या जीवनात बदल, समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या कामात आणण्याचे काम त्यांनी केले. 
 
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ’गेली अनेक वर्षे  प्रभुणे हे वंचित घटकांतील मुलांची सेवा करीत आहेत.  प्रभुणे यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून क्रांतीवीर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट काढले. चापेकर वाडा दुरुस्तीसाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना १८ कोटी रुपयांचा निधी दिला. प्रभुणे यांच्या प्रयत्नामुळे चापेकरवाडा विकसित करण्यात आला आहे.  आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ’पुनरुत्थान समरसता  गुरुकुलममध्ये वंचित घटकांतील मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. पारधी समाजाचे मुले शिक्षणामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. प्रभुणे यांच्या कामाचा प्रवाह नदीप्रमाणे आहे’. 
 
सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले, ’आणखी खूप कामे करायची आहेत. या कामात अनेकांनी मदत केली तर अनेकांनी अडथळेही आणले. स्वयंसेवकच्या शाखा निधी गोळा करून गुरुकुलम, यमगरवाडीसाठी देतात. त्यामुळे हे काम करणे शक्य झाले आहे. यमगरवाडीतील शाळेत शिक्षण घेतलेली अनेक मुले, मुली मोठे अधिकारी, उच्च शिक्षित झाले. नगरसेवक झाले. मी तरुण वयात उनाडक्या करीत होतो. मात्र, संघ शाखेमुळे चांगल्या कामात आलो.  शेवटपर्यंत समाजासाठी काम करीत राहणार आहे’. पद्मश्री रमेश पतंगे, आमदार शंकर जगताप, यमगरवाडीच्या प्रकल्पातील माधवराव गायकवाड, ललिता जाधव यांनीही  मनोगत व्यक्त केले. डॉ.सुनिल भंडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.दिगंभर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले.  संजय तांबट यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles