तळमळीच्या द्रष्ट्या डॉक्टर!   

चर्चेतील चेहरे : राहुल गोखले 

अल्ट्रासोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन या निदान पद्धती आता भारतातही रूढ झाल्या आहेत. पण पन्नास वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. जगातील प्रगत राष्ट्रांत या निदान पद्धती सर्रास वापरण्यात येत असल्या तरी हे तंत्रज्ञान भारताला परवडणारे नाही; भारत गरीब आहे अशी नोकरशाहीची भूमिका होती. मात्र रुग्णांच्या आजाराचे नेमके निदान करण्यासाठी हे तंत्रज्ञान भारतात आणणे निकडीचे आहे याचा पाठपुरवठा डॉ स्नेह भार्गव यांनी केला. ‘एम्स’ रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख असणार्‍या डॉ भार्गव यांनी, ’आपण तीनशे प्रवाशांच्या आनंदासाठी जेट विमाने खरेदी करतो; पण लाखो रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थेसाठीचे तंत्रज्ञान मात्र नाकारतो’ हा केलेला युक्तिवाद बिनतोड होताच; पण रुग्णांविषयीच्या त्यांच्या बांधिलकीचेही ते द्योतक होते. पुढे भारतात हे तंत्रज्ञान आले आणि प्रामुख्याने एक्सरे पुरता मर्यादित असलेला रेडिओलॉजी विभागही विस्ताराला. आता हे तंत्रज्ञान देशभर रोगनिदानासाठी वापरले जाते. या द्रष्टेपणाचे श्रेय ज्यांना जाते त्या डॉ भार्गव यांनी नुकतीच वयाची ९५ वर्षे पूर्ण केली. याच टप्प्यावर त्यांचे ’दि वूमन हू रॅन एम्स’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तकही प्रकाशित झाले.
 
डॉ.भार्गव या गेल्या शतकभराच्या केवळ साक्षीदार आहेत असे नाही. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने त्यात आपले योगदानही दिले आहे. एम्स रुग्णालयाच्या त्या १९८४ ते १९९० अशी सहा वर्षे संचालक होत्या. हे पद भूषविणार्‍या त्या पहिला महिला डॉक्टर होत्या. मात्र  त्यांची वाटचाल  आव्हानांनी भरलेली होती; पण डॉ भार्गव यांनी आत्मविश्वासाने त्या आव्हानांना तोंड दिले. त्यांच्या आयुष्याची सुरुवातच मुळी खडतर अनुभवांनी झाली. २३ जून १९३० रोजी त्यांचा जन्म अविभाजित भारतातील लाहोर येथे झाला. वास्तविक त्यांचे कुटुंब सुखवस्तू. त्यांचे वडील सनदी अधिकारी. पण  देशाची फाळणी झाली आणि या कुटुंबाला लाहोर सोडून भारतात येणे अपरिहार्य ठरले. पाकिस्तानातील झेलम शहरापासून नवस्वतंत्र भारतातील फिरोजपूर शहरापर्यंतचा प्रवास फाळणीने उसळलेल्या दंगलींच्या भीषणतेची प्रचिती आणून देणारा होता. भारतात आल्यावर त्यांच्या वडिलांनी निर्वासितांसाठी छावणी सुरु केली. तेथे विस्थापितांच्या कथा व व्यथा डॉ भार्गव यांना ऐकायला मिळत असत. पण त्यापेक्षा त्यांना तेथील परिसरात एक पावडर शिंपडण्यास सांगण्यात आले त्याचा त्यांच्यावर जास्त प्रभाव पडला. अतिसार, उलट्या होणार्‍या रुग्ण-निर्वाससितांना जेथे ठेवण्यात आले होते तेथे संसर्ग पसरू नये म्हणून ती उपाययोजना होती. आपण डॉक्टर झालो तर रुग्णांची सेवा करू शकू अशी कल्पना प्रथम डॉ भार्गव यांच्या डोक्यात तेंव्हा डोकावली. आणि मग त्यांनी त्याचा ध्यास घेतला.
 
दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातून त्या पदवीधर झाल्या. त्यानंतर पुढे नेमक्या कोणत्या विभागात काम करायचे हे ठरवण्यासाठी त्या सर्व विभागांत स्वतः जाऊन आल्या; तेंव्हा त्यांना रेडिओलॉजी विभागाने खुणावले. लवकरच डॉ भार्गव यांना त्यांचे मार्गदर्शक डॉ गाडेकर यांनी परदेशात जाऊन रेडिओलॉजीचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. तेंव्हा त्या लंडन येथील वेस्टमिन्स्टर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्या. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कदाचित त्यांनी तेथेच वास्तव्य केले असते. पण भारताला प्रशिक्षित रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांची गरज आहे अशी माहिती त्यांना त्यांच्या मार्गदर्शकांकडून मिळाली; तेंव्हा त्या स्वदेशी परतल्या. १९५८ मध्ये त्या एम्स रुग्णालयात रुजू झाल्या. त्यावेळी रेडिओलॉजी विभाग म्हणजे केवळ एक्सरे पुरता मर्यादित होता. किंबहुना या शाखेत प्राविण्य मिळविलेले डॉक्टर म्हणजे छायाचित्रकारच आहेत अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिले जाई. डॉ भार्गव एम्सच्या त्या विभागात रुजू झाल्या व त्यांनी रेडिओलॉजी विभागाला आकार देण्यास सुरुवात केली. १९७० मध्ये त्या विभागाचे प्रमुखपद त्यांच्याकडे आले. या मधल्या काळात त्यांनी अनेक ’व्हीआयपी’ना तपासले आणि त्यांच्या व्याधीचे निदान केले. रेडिओलॉजी शाखेचा रोगनिदानात किती मोठा वाटा आहे हेच त्यांनी एका अर्थाने अधोरेखित केले.
 
त्यांनी ज्या रुग्णांची तपासणी केली त्यांत पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हेही होते. १९६२ मध्ये ते एम्समध्ये तपासणीसाठी आले तेंव्हा त्यांचा एक्सरे काढण्यासाठी आवश्यक बेरियम क्षाराचे द्रावण डॉ भार्गव यांनीच तयार केले; पण त्यापलीकडे जाऊन पं.नेहरूंच्या छातीच्या एक्सरेवरून नेहरूंच्या मुख्य धमनीत छातीच्या भागात सूज असल्याचे आणि ती स्थिती चिंताजनक असल्याचे निदान डॉ भार्गव यांनी केले होते. पुढे दोन वर्षांतच नेहरूंचे देहावसान झाले तेंव्हा डॉ भार्गव यांनी केलेल्या निदानाची आठवण अनेकांना झाली. एम्समध्ये त्यांच्या कारकीर्दीतील महत्वाचा क्षण आला तो १९८४ साली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी डॉ भार्गव यांची नियुक्ती एम्सच्या संचालकपदी केली होती. मात्र त्यावेळी पुरुषी वर्चस्वाचे सूर प्रकट होऊ लागले. एम्ससारख्या रुग्णालयाचे प्रमुखपद एका महिलेकडे असूच शकत नाही असा सूर काहींनी लावला होता. वास्तविक एम्स रुग्णालयाची स्थापनाच मुळी एका महिला मंत्र्यांच्या पुढाकारातून झाली. स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर यांनी १९५६ मध्ये मांडलेल्या एम्स विधेयकाच्या मंजूर होण्यातून या रुग्णालयाची पायाभरणी झाली होती. शिवाय डॉ भार्गव यांची नेमणूक इंदिरा गांधी यांनी केली होती- त्याही महिला. तरीही एम्सच्या प्रमुखपदी डॉ भार्गव यांच्या रूपाने एका स्त्रीने असणे अनेकांना पचविणे कठीण गेले.
 
त्यातच विचित्र योगायोग असा की ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी डॉ भार्गव यांनी संचालकपदाची सूत्रे स्वीकारली; त्याच दिवशी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. ती सर्व आणीबाणीची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी डॉ भार्गव यांच्यावर आली. ती त्यांनी निगुतीने निभावली. पण त्याच वेळी काही प्रतिक्रिया या आता डॉ भार्गव एम्सच्या संचालकपदी राहू शकणार नाहीत अशा स्वरूपाच्या होत्या. तथापि पंतप्रधान झालेले राजीव गांधी यांनी डॉ भार्गव यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले. संचालक म्हणून डॉ भार्गव यांनी एम्सचा विस्तारच केला असे नाही तर रुग्ण, डॉक्टर या दोन्ही मुख्य घटकांच्या हितासाठी त्या कायम झटल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीख विरोधी दंगलीची झळ एम्समधील शीख डॉक्टरांना बसू नये यासाठी त्यांनी पोलीस संरक्षणाची व्यवस्था केली. त्यांच्या संचालकपदाचा कार्यकाळात एम्समध्ये रेडिओलॉजीशी निगडित चार विभागांची स्थापना झाली. वैद्यकीय विद्यार्थ्यांना अध्यापनाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी त्यांनी वैद्यकीय शिक्षण व तंत्रज्ञान केंद्राची सुरुवात केली. त्यांच्याच कार्यकाळात एम्समध्ये रक्तसंकलन व्यवस्था मजबूत झाली. संचालक म्हणून त्यांनी कायम स्जिस्तीचा आग्रह धरला; रुग्णांचे हित सर्वोपरी मानले. असंख्य नवोदित रेडिओलॉजिस्ट डॉ भार्गव यांनी घडविले. त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला. ‘दि नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया’ या १९९० च्या दशकात सुरु झालेल्या शोध नियतकालिकाच्या स्थापनेत डॉ भार्गव यांचेही योगदान होते.
 
१९९० साली वयाच्या साठाव्या वर्षी त्या एम्समधून निवृत्त झाल्या तरी त्या कार्यमग्न राहिल्या. दोन मोठ्या धर्मादाय रुग्णालयांच्या उभारणीत त्यांनी स्वतःस झोकून दिलेच; पण तेथे त्यांनी स्वतः डॉक्टर म्हणूनही सेवा दिली. एक पारंगत रेडिओलॉजिस्ट असा लौकिक मिळविलेल्या डॉ भार्गव यांनी केवळ एम्सच्याच नव्हे तर एकूणच भारतातील वैद्यकीय व्यवस्थेवर आपला ठसा उमटविला आणि स्त्री म्हणून सुरुवातीस होणार्‍या विरोधाला आपल्या कर्तृत्वानेच उत्तर दिले. १९९१ मध्ये  डॉ भार्गव यांचा सन्मान पदमश्रीने करण्यात आला होता ही त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावतीच.
 
डॉ.भार्गव यांनी कधीही रोजनिशी लिहिली नाही; किंबहुना कोणत्याही लेखनापासून त्या दूरच होत्या. त्या केवळ एका छोट्या वहीत झाल्या चुकांची नोंद करून ठेवत असत. हेतू हा की त्या चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये. वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत डॉ भार्गव वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. पण करोना काळात घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आणि मग त्यांनी पुस्तकाचे लेखन आरंभले. एका शतकाचा काळ पाहिलेल्या डॉ भार्गव यांनी त्या प्रद्रीर्घ काळात घडली स्थित्यंतरेही अनुभवली आहेत. एके काळची फॅमिली  डॉक्टरची संकल्पना लोप पावली आहे याची त्यांना खंत वाटते. वैद्यकीय क्षेत्रात शिरलेल्या गैरप्रकारांची त्या निंदा करतात. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते हे मानवी आहे आणि तंत्रज्ञान कितीही विकसित झाले; कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान आले तरी ते मानवी संबंध कायम राहिले पाहिजेत; अन्यथा हा पेशा भावनिक दिवाळखोरीकडे जाईल अशी इशारावजा अपेक्षा त्या व्यक्त करतात.एम्सच्या संचालक असताना डॉ भार्गव यांना अनेकदा ’व्हीआयपी’ रुग्णांना तपासावे लागे आणि काहीदा कटुता घ्यावी लागत असे. एका नेत्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील एका भागात परवानगी न घेता ठिय्याच मांडला होता. तेंव्हा त्या आप्तेष्टाना तेथून जाण्यास सांगावे अशी सूचना डॉ भार्गव यांनी सरकारमधील यंत्रणेला केली. हे त्या नेत्याला समजताच तो इतका संतापला की त्याने तसे घडल्यास ‘आपण एम्सच्या भिंती पाडून टाकू’ अशी धमकी दिली होती. तेंव्हा डॉ भार्गव यांनी त्यांस उत्तर दिले: ‘महाशय, एम्सच्या भिंती आणि माझे खांदे इतके कामुकवत नाहीत की तुम्ही त्यांना धक्का देऊ शकाल.’ भारताची आजची वैद्यकीय व्यवस्था ज्या असंख्य व अनेक अज्ञात ध्ययेनिष्ठ, समर्पित आणि रुग्णांच्या हिताची कळकळ असलेल्या डॉक्टरांच्या भक्कम खांद्यावर उभी आहे त्यांचे प्रतिनिधित्व डॉ भार्गव करतात असे म्हणणे उचित ठरेल. म्हणूनच डॉ स्नेह भार्गव यांनी दिलेल्या इशार्‍यांकडे वैद्यकीय क्षेत्र गांभीर्याने पाहील असा आशावाद व्यक्त करायला हरकत नाही!

Related Articles