जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार   

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवल्याचे समजते. नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी मंगळवारी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत जयंत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
 
जयंत पाटील हे आधी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी वाट निवडल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि त्यानंतर उदयास आलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदाची धुराही शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या खांद्यावरच देणे पसंत केले. जयंत पाटील हे शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे निष्ठावंत सहकारी आहेत. मात्र पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सलग दोन टर्म पूर्ण केल्याने आता नव्या चेहऱ्याला संधी मिळावी, अशी मागणी पक्षातील विविध नेत्यांकडून केली जात आहे.

Related Articles