इंधन पुरवठा खंडित झाल्याने कोसळले विमान   

अहमदाबाद अपघात; प्राथमिक अहवाल समोर

नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा खंडित झाला होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दोन्ही वैमानिकांमधील संवादही समोर आला असून, एक वैमानिक इंधन नियंत्रण स्विच बंद केले का? असा प्रश्न करतो. तर, दुसरा वैमानिक नाही, असे उत्तर देतो. प्राथमिक अहवाल १५ पानांचा हा असून वैमानिक अखेरच्या क्षणापर्यंत इंधन सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, हेही समोर आले आहे.विमानात दोन इंजिन आणि दोन इंधन नियंत्रण स्वीच असतात. ‘रन’ हे स्वीच इंजिन सुरू करण्यासाठी आणि ‘कट ऑफ’ हे स्वीच इंधन बंद करण्यासाठी वापरले जातात. 
 
इंधन स्विचची स्थिती बंद चालू करण्याची एक प्रक्रिया आहे. ती, आपोआप बदलली जात नाही. स्विचची स्थिती बदलण्यासाठी आधी ते वर ओढावे लागते आणि त्यानंतर ते ‘रन’ आणि ‘कट ऑफ’ करावे लागते. बोईंग ७८७ ड्रीमलायनरमध्ये इंधन स्विचेस थ्रस्ट लीव्हर्सच्या खाली असतात. अपघातग्रस्त विमानाच्या दोन्ही इंजिनमधील इंधन स्वीच एका सेकंदाच्या अंतराने बंद झाले आणि नंतर ते चालू करण्यात आले.अहवालानुसार, विमानाला कोणताही पक्षी आदळल्याचे सूचित करणारा आणि घातपाताचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. हवामान स्वच्छ होते आणि वार्‍याचा वेगही कमी होता. दोन्ही वैमानिकांकडे पुरेसा उड्डाण अनुभव होता.वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले. एक इंजिन काही काळासाठी सुरू झाले, परंतु दुसरे सुरू होऊ शकले नाही. अपघातापूर्वी विमान ३२ सेकंद हवेत होते. विमानाच्या थ्रस्ट लिव्हरसुद्धा निष्क्रिय अवस्थेत आढळले, ज्यामुळे त्यात बिघाड असल्याचे सूचित होते. उड्डाणावेळी विमानाला पूर्ण थ्रस्ट मिळाला होता. इंधनात कोणतीही भेसळ आढळली नाही. 
 
अहमदाबादहून लंडनकडे २४२ प्रवासी आणि कर्मचार्‍यांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान १२ जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही क्षणात मेघानीनगर परिसरातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर कोसळले होते. यामध्ये विमानातील २४१ जणांसह २७१ जणांचा मृत्यू झाला होता. यात ६१ परदेशी नागरिकांचा समावेश होता. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे या विमान अपघातात निधन झाले होते. तर, एक प्रवासी चमत्कारिकरीत्या बचावला होता. कॅप्टन सुमित सभरवाल यांना विमान उड्डाणाचा ८,५९६ तासांचा अनुभव होता. तर सहवैमानिक कुंदर यांचा १,१२८  तासांचा अनुभव होता. विमान अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता. हा तपास ’आव्हानात्मक’ असल्याचे सांगत नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केंद्रीय मंत्र्यांनी पारदर्शक, परिपक्व आणि व्यावसायिक पद्धतीने तपास केल्याबद्दल विमान अपघात अन्वेषण विभागाने कौतुक केले. 
 
वैमानिक संघटनांचा आक्षेप
 
एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीचा सूर आणि दिशा वैमानिकांची चूक दर्शविण्याकडे असल्याचा दावा एअरलाइन पायलटस असोसिएशन ऑफ इंडियाने (एएलपीए) शनिवारी केेला. तसेच, विमान अपघाताची निष्पक्ष आणि तथ्यांवर आधारित चौकशी करण्याची मागणी केली.  विमान अपघाताचा हा प्राथमिक अहवाल आहे. पण, यावरून निष्कर्ष काढून वैमानिकांमध्ये झालेले संभाषण या अपघातासाठी गृहीत धरू नये असे, एएलपीएने निवेदनात म्हटले आहे. तसेच, प्राथमिक अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अहवालातील एकूण माहिती आणि चौकशीची दिशा ही वैमानिकाच्या चुकीकडे झुकत आहे. या अहवालामुळे तयार होत असलेले संशयास्पद पूर्वग्रह आम्ही स्पष्टपणे फेटाळतो आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करतो, असे एएलपीएने निवेदनात म्हटले आहे. यासोबतच, अहवाल प्रसारमाध्यमांकडे गेला कसा? असा सवालही केला आहे. 
 
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये एक वैमानिक दुसर्‍याला ’इंधन पुरवठा का बंद केला?’ असे विचारताना ऐकू येत आहे. त्यावर दुसर्‍या वैमानिकाने ’मी नाही केले’ असे उत्तर दिले. त्यामुळे, इंधन नियंत्रण स्वीच नेमके बंद कसे झाले, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles