बलुचिस्तानात बंडखोरांचे मोठे हल्ले   

बसवरील हल्ल्यात नऊ प्रवासी ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील बलुच बंडखोरांनी लष्कराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. अनेक सरकारी ठिकाणांवर एकाच वेळी त्यांनी जोरदार हल्ले चढविले.  बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. बीएलएफने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन बाम (डॉन) सुरू केल्याचे म्हटले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये किमान १७ हल्ले झाले आहेत. ज्यात पंजगुर, सुरब, केच आणि खारान यांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी एका बसवर केलेल्या हल्ल्यात नऊ प्रवासी ठार झाल्याचे उघड झाले. 
 
बीएलएफने प्रामुख्याने पाकिस्तानी लष्करी चौक्या, संपर्क मार्ग आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य केले आहे. बीएलएफचे प्रवक्ते मेजर ग्वाराम बलोच यांनी या कारवाईचे वर्णन बलूच राष्ट्रीय मुक्ती संग्रामातील एक नवीन पहाट असे केले. ते म्हणाले, मकरन किनारपट्टीच्या प्रदेशापासून डोंगराळ कोह-ए-सुलेमान पर्वतरांगांपर्यंत कारवाईची व्याप्ती होती. पाकिस्तानी सुरक्षा दलांची जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी आणि त्यांच्या चौक्यांचे नुकसान व्हावे, यासाठी प्रयत्न केले. आम्ही एका मोठ्या क्षेत्रात मोहीम राबवत आहोत. ऑपरेशन बाम मोहिमेत बलुच सैनिक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत, असे मेजर ग्वाहारम यांनी सांगितले.

बीएलएफचा सर्वात मोठा हल्ला

बलुचिस्तानात बंडखोरांनी आतापर्यंत केलेल्या हल्ल्यापैकी सर्वांत मोठा हल्ला असल्याचे म्हटले आहे. बलुच बहुल प्रांतातील अशांतता आणि फुटीरतावाद वाढल्याचे हल्ले द्योतक ठरले आहेत. पाकिस्तान सरकारवर बलुचिस्तानच्या साधन सामग्रीचे शोषण करत आहे. नागरिकांना त्याचा लाभ देत नाही. मूलभूत हक्क आणि स्वायत्ततेपासून वंचित ठेवले जात आहे, असा  आरोपही बंडखोरांचा आहे. 

Related Articles