हरयानाच्या माजी आमदारास पोलिसांना शरण जाण्याचे आदेश   

नवी दिल्ली : दीड हजार कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात हरयानातील माजी काँग्रेस आमदार धरम सिंह छोक्कर यांना आज  (शनिवारी) तातडीने तुरुंगात शरण जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. तसेच, पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध छोक्कर यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
 
४ मे रोजी नवी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमधून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी छोक्कर यांना अटक केली होती. त्यावेळी आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असा दावा छोक्कर यांनी केला होता. दरम्यान, पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाने १९ जून रोजी छोक्कर यांना वैद्यकीय कारणास्तव हंगामी जामीन मंजूर केला. तसेच, सोयीच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. मात्र, छोक्कर याने जामीन काळात कोणतीही शस्त्रक्रिया करून घेतली नाही. ५ जुलै रोजी रुग्णालयातून तो घरी परतला होता. न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या पीठाने छोक्कर यांना आज सायंकाळी पाचपर्यंत तुरुंग अधिकार्‍यांसमोर शरण जाण्याचे आदेश दिले.

Related Articles