शनि शिंगणापूर देवस्थानात कोट्यवधीचा गैरव्यवहार   

बनावट कर्मचारी दाखवून, डमी अ‍ॅप तयार करून लूटमार

मुंबई, (प्रतिनिधी)  : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. २५० कर्मचार्‍यांवर देवस्थानचा कारभार व्यवस्थित सुरू असताना २,४४७ कर्मचार्‍यांची कागदावर भरती करण्यात आली. देवस्थानच्या नावाने खोटे अ‍ॅप तयार करून भाविकांना लुटण्याचा प्रकार सुरू होता. देवाच्या नावावर भ्रष्टाचार करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई केली जाईल. कोणाची अजिबात गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून तेथे पंढरपूर, शिर्डी प्रमाणे नवी व्यवस्था निर्माण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 
 
शनिशिंगणापूर मंदिरातील गैरव्यवहाराबद्दल शिवसेनेच्या विठ्ठल लंघे यांनी काल लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये काही कर्मचारी व पुजार्‍यांनी बनावट अ‍ॅप, पावती पुस्तक तयार करून शेकडो कोटींचा गैरव्यवहार केला आहे, शनिभक्तांची फसवणूक केली आहे, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. भाजपच्या सुरेश धस यांनीही ही मागणी लावून धरताना, हा काही छोटामोठा नव्हे तर जवळपास ५०० कोटींचा गैरव्यवहार असल्याचा आरोप केला. या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी हा प्रचंड मोठा गैरव्यवहार असल्याचे सांगत भ्रष्टाचाराचा धक्कादायक तपशील सभागृहाला सांगितला.     
 
देवस्थानातील गैरव्यवहाराबाबत तक्रार आल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आला असून त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मी स्वत: अनेकदा या देवस्थानला भेट दिली आहे. पूर्वी दोन-अडीचशे कर्मचारी होते व मंदिराचा कारभार नीट चालत होता. विश्वस्त मंडळाने तब्बल २,४४७ कर्मचार्‍यांची भरती केली. ते देखील सर्व बोगस. रुग्णालयात ३२७ कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात तेथे केवळ ४ डॉक्टर ९ कर्मचारी हजर होते. अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी ८० कर्मचारी नेमण्यात आल्याचे दाखवले. भक्तनिवासात १०९ खोल्या आहेत. या १०९ खोल्याकरता २०० कर्मचारी कार्यरत असे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात दोनर्‍चार कर्मचारी हजर होते. त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता ८ व तेलविक्रीसाठी ४ असे १२ काउंटर असल्याचे व त्यावर ३५२ कर्मचारी काम करत असल्याचे कागदोपत्री दाखवले होते. तिथे केवळ २ कर्मचारी काम करतात. देवस्थानच्या स्वत:च्या १३ मोटारी आहेत, त्यासाठी १६३ कर्मचारी दाखविले. प्रत्यक्ष तेराच कर्मचारी होते. शेतीविभागात ३५ एकर जमीन ६५ कर्मचारी दाखविले. गोशाळा विभागात ८२ कर्मचारी दाखविले. त्यातील २६ कर्मचारी रात्री १ पासून काम करत होते.  विद्युत विभागात केवळ एका युनिटला २०० कर्मचारी दाखविण्यात आले. २ हजार ४७४ कर्मचारी कार्यरत दाखविले यातील कोणाचेही मस्टर नाही, हजेरी नाही. स्वाक्षरीदेखील नाही. कार्यकर्त्यानाच खाती उघडायला लावली. मंदिराच्या खात्यातून यांच्या खात्यात परस्पर पगार म्हणून पैसे जात असल्याचे चौकशीत पुढे आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तेव्हा संपूर्ण सभागृह आवाक झाले होते.
 
डमी अ‍ॅपवर भक्तांकडून देणग्या घेतल्या जायच्या आणि त्यातील कोट्यवधी हे विश्वस्तांच्या कार्यकर्त्यांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यांमध्ये परस्पर जमा व्हायचे असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला. या प्रकाराची सायबर सेलच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या देवस्थानबद्दल पहिल्यांदा तक्रार आली तेव्हा ऑडिटर कडून चौकशी केली गेली, आणि त्यांनी देवस्थानला क्लीन चिट दिली होती. आता त्यांचीही विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देवस्थानातील गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, पोलिसांचे बाहेरचे पथक पाठवून चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. पंढरपूर, शिर्डीप्रमाणे येथेही समिती नेमली जाईल. पण, त्याआधी देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणार्‍यांना कारवाई करणे आवश्यक आहे. विश्ववस्तांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
 

Related Articles