उजनी सव्वा महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले   

सोलापूरकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सध्या ९४ टक्के भरले असून, एकूण पाणीसाठा ११४ टीएमसी झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे. 
 
सध्या दौंड येथून उजनीमध्ये २० हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे  धरणातून भीमा नदीत १६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. तर, विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.   
 
२७ मे पर्यंत उणे पातळीत असलेले उजनी धरण सव्वा महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात दौंड व स्थानिक पावसाची आवक जास्त असल्यामुळे आतापर्यंत सुमारे २० टीएमसी म्हणजेच ४० टक्के पाणी भीमा नदीतून सोडण्यात आले आहे. सध्या उजनीतून कॅनॉलद्वारे ११००, बोगद्यातून ४०० क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन योजनेमधून ८०० क्युसेक आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेमधून ८० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. पावसाळा आणखी दोन ते अडीच महिने असल्यामुळे उजनीचा पाणीसाठा ९२ ते ९४ टक्के पर्यंत ठेवला जात आहे. जेणेकरून, आगामी काळात पाण्याची आवक लक्षात घेऊन पाणी नदीतून सोडावे लागणार नाही. मागील वीस दिवसांपासून कालव्यामधून पाणी सोडण्यात आले आहे. पण, बहुतेक शेतकरी ते पाणी घेत नाहीत. त्यामुळे ते पाणी आहे तसे नदीला जाऊन मिळत असल्याची स्थिती आहे. 

नदी काठाच्या रहिवाशांना इशारा

उजनी धरणातून भीमा नदीत सध्या १६ हजार ६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. दौंडवरून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब मोरे यांनी नदी काठावरील शेतकर्‍यांना, रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. उजनी धरणातून भीमा नदी सोडण्यात येणारे पाणी एक-दोन दिवसांत आणखी पाच हजार क्युसेक वेगाने वाढवले जाऊ शकते. यासाठी नदीकाठच्या शेतकर्‍यांना तसेच रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
 

Related Articles