शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच   

मुंबई : राज्यभरातील शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. 
 
सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सामंत बोलत होते. या चर्चेत निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला. 
सामंत म्हणाले की, राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना अंशदान निवृत्ती वेतन योजना राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ पासून लागू केली. त्यानंतर २०१५ पासून ही योजना केंद्र सरकारच्या नवीन निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यात आली. शिक्षकांना अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची बाब सध्या अर्थ विभागाच्या विचाराधीन आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच महानगरपालिका व नगरपालिकांतील शिक्षकांनाही शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच लाभ मिळावेत, या संदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
 

Related Articles